पुरुष दुहेरीतच विजेतेपदाच्या आशा कायम; अन्य सर्व गटांत भारतीयांचे आव्हान संपुष्टातह्णपीटीआय, फुजहोऊ (चीन)

भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखली आहे. एकीकडे पुरुष व महिला एकेरीत भारताचे नामांकित खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना सात्त्विक-चिराग यांनी गुरुवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

थायलंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते आणि फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेते सात्त्विक-चिराग यांनी जपानची सहाव्या मानांकित जोडी हिरोयुकी इंडो आणि युटा वाटांबे यांचा एक तास आणि सहा मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१८, २१-२३, २१-११ असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग यांचा इंडो आणि वाटांबेविरुद्ध हा सलग दुसरा विजय ठरला. फ्रेंच स्पर्धेतही त्यांनी या जपानी जोडीविरुद्ध सरशी साधली होती. शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सात्त्विक-चिराग यांच्यासमोर ली जुन हुई आणि लि यू चेन यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या स्पर्धेत सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत प्रवेश करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

साईप्रणीत, कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत गारद

पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांना पराभव पत्करावा लागला. एक तास आणि २४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात डेन्मार्कच्या चौथ्या मानांकित आंद्रेस अ‍ॅन्टोसेनने साईप्रणीतला २०-२२, २२-२०, २१-१६ असे पिछाडीवरून पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या साईप्रणीतने जपान बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु त्यानंतर त्याची कामगिरी ढासळली आहे.

अन्य लढतीत जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानी असलेल्या कश्यपला डेन्मार्कच्याच सातव्या मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेल्सनकडून १३-२१, १९-२१ असा सरळ दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. हा सामना फक्त ४३ मिनिटे रंगला. कश्यप आणि साईप्रणीत या दोघांच्या पराभवामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा यांना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.

सात्त्विक-अश्विनी यांचा मिश्र दुहेरीत पराभव

मिश्र दुहेरीत सात्त्विक आणि अश्विनी पोनप्पा यांचेही आव्हान संपुष्टात आले. सात्त्विक आणि अश्विनी यांच्यावर दक्षिण कोरियाच्या पाचव्या मानांकित सीओ सुंग आणि चेई युजुंग या जोडीने २१-१६, २३-२१ अशी मात केली. एन सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांना बुधवारीच पराभव पत्करावा लागला होता.

३सलग तिसऱ्या स्पर्धेत साईप्रणीतला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. यापूर्वी झालेल्या कोरिया आणि डेन्मार्क स्पर्धेतसुद्धा त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

२कश्यपला या वर्षांत दुसऱ्यांदा व्हिक्टरकडून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मार्चमध्ये झालेल्या इंडिया बॅडमिंटन स्पर्धेतसुद्धा व्हिक्टरने कश्यपला धूळ चारली होती.