सौरभ वर्मा पराभूत; माजी विश्वविजेत्या लिन डॅनला पराभवाचा धक्का

जागतिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने चीन खुल्या बॅडमिंटन सुपर सीरिज स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, भारताच्या सौरभ वर्माला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. माजी विश्वविजेत्या लिन डॅनलाही पहिल्या फेरीत धक्का बसला.

सायनाने पहिल्या फेरीत अमेरिकच्या बेईवेन झांगवर २१-१३, २१-१९ अशी मात केली. सौरभला फ्रान्सच्या ब्राईस लेव्हेर्डेझने २१-१४, १५-२१, २१-११ असे पराभूत केले.  जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने जपानच्या सयाका साटोवर २४-२२, २३-२१ असा ५९ मिनिटांत विजय मिळवला. पुरुष एकेरीत प्रणॉयने कोरियाच्या डाँग केयून लीवर १८-२१, २१-१६, २१-१९ अशी मात केली.

भारताच्या सात्त्विकसाईराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना पुरुषांच्या दुहेरीच्या पहिल्या लढतीत तर मिश्रदुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. रणकिरेड्डी व शेट्टी यांना चीनच्या चेंग लिऊ व नान झांग यांनी २१-१३, २१-१३ असे सहज पराभूत केले. अश्विनी व सिक्की यांना दक्षिण कोरियाच्या हाना बेक व चेई पुजूंग यांनी २१-१४, २१-१५ असे नमवले.

सायनाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूला नमवत अजिंक्यपद मिळवले होते. त्यामुळे तिच्या कामगिरीबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. तिने झांगला अध्र्या तासात पराभूत करताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये झांगने तिला चांगली झुंज दिली मात्र सुपर सीरिजचा भरपूर अनुभव पाठिशी असलेल्या सायनाने खेळावरील नियंत्रण कायम ठेवत हा गेम घेत सामनाजिंकला. सायनाला पुढच्या फेरीत पाचव्या मानांकित अकेनी यामागुचीशी खेळावे लागणार आहे. यामागुचीने पहिल्या सामन्यात चीनच्या झिओझिन चेनचा २१-१२, २१-१४ असा पराभव केला.   इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता लिन डॅनवर २१-१९, २१-१६ असा सनसनाटी विजय नोंदवला.

लिन डॅनने ख्रिस्तीविरुद्धच्या सामन्यात सात वेळा मॅचपॉइंट वाचवला. मात्र ख्रिस्तीने चिकाटीने खेळ करत त्याला पराभवाचा तडाखा दिला. ३४ वर्षीय खेळाडू लिन हा सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. लिन याला येथे द्वितीय मानांकन देण्यात आले होते. त्याने या स्पर्धेच पाच वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. २० वर्षीय खेळाडू ख्रिस्तीने त्याच्या चुकांचा फायदा घेत सामना जिंकला. त्याच्यापुढे हाँगकाँगच्या अँगुस निगचे आव्हान असणार आहे.