फुझोऊ (चीन) : ऑलिम्पिक रौप्यविजेती पी.व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या दोघांनाही शनिवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. भारताचे दोघेही अव्वल बॅडमिंटनपटू पराभूत झाल्याने भारताच्या आशेवर पाणी फेरले गेले.

ही बिंगजिआओकडूनच सिंधूला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. यंदाच्या वर्षी जुलैमध्ये इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही बिंगजिआओकडूनच पराभूत झाल्याने तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर शनिवारी तिसऱ्यांदा पुन्हा दोघी आमने-सामने असल्याने सिंधू तिच्या यापूर्वीच्या दोन पराभवांचा वचपा काढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या सामन्यात सिंधूला २१-१७,१७-२१,२१-१५ असा पराभव स्वीकारावा लागला.

सिंधूने सामन्याच्या प्रारंभापासूनच सामन्यावर पकड मिळवत आधी ४-१ आणि नंतर ८-३ अशी आघाडीही घेतली. त्यानंतर बिंगजिआओने ९-९, १५-१५ अशी बरोबरी साधत पहिला गेम १७-२१ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये बिंगजिआओने पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर उसळी मारत सिंधूने ११-७ अशी आघाडी घेतली. ही आघाडी अशीच वाढवत नेत सिंधूने दुसरा गेम २१-१७ असा जिंकला. त्यामुळे तिसऱ्या गेमपर्यंत लढत लांबली. बिंगजिआओने तिसऱ्या गेमच्या प्रारंभापासून आक्रमक धोरण स्वीकारत ११-६ अशी घेतलेली आघाडी १५-८ पर्यंत वाढवली. त्यानंतर सिंधूने पुन्हा दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत १५-१६ अशी बिंगजिआओच्या जवळपास पोहोचली.पण त्यानंतर बिंगजिआओने सिंधूला अजिबात संधी न देता सलग पाच गुण घेत तिसरा गेम २१-१५ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चायनीज तैपेईच्या चाऊ तिआन चेनचे आव्हान श्रीकांतला पेलवले नाही. दोन सरळ गेममध्ये १४-२१,१४-२१ असा पराभव पत्करत श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीतच गारद व्हावे लागले. सामन्याच्या पूर्वार्धात श्रीकांतने १०-८ अशी आघाडी घेत विजयाची आशा निर्माण केली.

मात्र, त्यानंतर चेनने सामन्याची सूत्रे हातात घेत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर प्रारंभीच श्रीकांत ४-१० असा पिछाडीवर पडला. त्यानंतर त्याने तीन गुण मिळवत ही आघाडी ७-१० अशी कमी केली. अखेरीस ११-१८ अशा पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतला सामना फिरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे सरळ दोन गेममध्ये १४-२१,१४-२१ असा पराभव पत्करून श्रीकांतला गाशा गुंडाळावा लागला.