बॅडमिंटन सिंगल्स प्रकारातला दिग्गज खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेचा चीनी खेळाडू लिन-डॅनने निवृत्तीची घोषणा केली आहे. २००८ बिजींग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सिंगल्स प्रकारात विजेतेपद आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्णपदकं अशी बहारदार कामगिरी केल्यानंतर ३७ वर्षीय लिन-डॅनने निवृत्ती स्विकारली आहे.

“खेळ हे माझं सर्वस्व मानत मी इतकी वर्ष प्रवास केला. या प्रवासात माझा परिवार, माझे प्रशिक्षक, माझा चाहता वर्ग आणि माझे इतर सहकारी यांची मला चांगली साथ मिळाली. कारकिर्दीत अनेक चांगले-वाईट क्षण मी या जोरावरच निभावून नेले आहेत. आता माझं वय ३७ झालं आहे, त्यामुळे शरीर साथ देत नाही आणि खेळताना होणारी दुखापत आणि त्यातून होणाऱ्या वेदना आता सहन होत नाही. त्यामुळे मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.” चीनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत लिन-डॅनने आपलं मनोगत व्यक्त केलं.

लिन-डॅनने याआधीच टोकियो ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात धडाकेबाज खेळाने ‘Bad Boy’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या लिन-डॅनने ६६६ एकेरी सामने जिंकले आहेत.