सध्या आपल्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असणाऱ्या श्रीकांतने फ्रेंच ओपन स्पर्धेच जेतेपद पटकावून कॅलेंडर वर्षात चार सुपर सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या श्रीकांतला आता अव्वल स्थानावर कब्जा करण्याची संधी आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटनवर चीनचं वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल, असे म्हटलंय.

जागतिक स्तरावर लीन डॅन आणि ली चाँग यांचे अनेक वर्षांपासून अधिराज्य आहे. पण आता काळ बदललाय. मी किंवा कोणताही भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये वेगळा ठसा उमटवू शकतो, असे मत श्रीकांतने व्यक्त केले.  सध्याच्या घडीला बॅडमिंटन कोर्टवर अनेक चांगले खेळाडू आहेत. कोणीही कोणाला पराभूत करु शकते. त्यामुळे उत्तम कामगिरी आणि खेळातील सातत्य राखण्यासाठी कठोर मेहनतीची गरज आहे. चांगल्या खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यावर भर दिल्यास यश दूर नाही, असेही तो म्हणाला.

आगामी चीन ओपन स्पर्धेत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेस का? असा प्रश्न श्रीकांतला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, कोणत्याही स्पर्धेत खेळताना मी क्रमवारीतील सुधारणा व्हावी, हा विचार घेऊन मैदानात उतरत नाही. तुम्ही सातत्यपूर्ण चांगली खेळी केली तर क्रमवारीत सुधारणा होईलच. त्यामुळे स्पर्धेत उत्तम खेळ करण्यावर अधिक भर देतो, असे श्रीकांतने सांगितले. श्रीकांतने २०१७ या वर्षात ५ सुपर सीरिज स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्यापैकी ४ स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्यात तो यशस्वी झालाय. श्रीकांतने आतापर्यंत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या सुपरसीरीज स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं आहे. या धडाकेबाज कामगिरीनंतर आता श्रीकांतला जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान खुणावतं आहे.