इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा

पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चीनच्या बॅडमिंटनपटूंच्या आरोग्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय बॅडमिंटन संघटनेला प्रश्नावली पाठवली आहे.

चीनच्या खेळाडूंना भारतात प्रवेश देण्यापूर्वी खेळाडूंच्या आरोग्याची चाचपणी करण्याच्या इराद्याने परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी भारतीय बॅडमिंटन संघटनेला ही प्रश्नावली पाठवली आहे. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने ही बॅडमिंटन स्पर्धा महत्त्वाची असणार आहे.

खेळाडू/अधिकारी चीनमधील कोणत्या राज्यातील आहेत? किती खेळाडू / अधिकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी झाली आहे का आणि त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे का? किती खेळाडू/अधिकारी अन्य देशांमधील येणार आहेत? अशा प्रश्नांचा यात समावेश आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने ही प्रश्नावली चीनमधील संघटनेला पाठवली असून, आता उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत, असे संघटनेचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेला चेन युफेई, आठव्या स्थानावर असलेला ही बिंगजिओ आणि माजी ऑल इंग्लंड विजेता शि यू क्वि हे चीनचे मातब्बर खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्तीचे यजमानपद बिशकेकने नाकारले

करोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून किर्गिझस्तानची राजधानी बिशकेकने पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेचे यजमानपद नाकारले आहे. शिआन येथे २७ ते २९ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. परंतु चीनमध्ये करोनामुळे गंभीर स्थिती उद्भवल्यामुळे ही स्पर्धा बिशकेकला हलवण्यात आली. परंतु किर्गिझस्तानमधील सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत देशातील सर्व क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक कुस्ती संघटनेने बिशकेकला स्पर्धा होणार नसल्याचे आशियाई कुस्ती महासंघाला कळवले आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल; ‘फिफा’चा इशारा

बेलफास्ट : करोना विषाणू संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) गियानी इन्फान्टिनो यांनी दिला आहे. ‘फिफा’चे मुख्यालय असलेल्या स्वित्र्झलडमधील दोन अव्वल विभागीय सामने पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. कारण येथील सरकारने एक हजारहून अधिक नागरिकांचा समावेश असलेल्या कोणत्याही उपक्रमावर बंदी घातली आहे. दरम्यान, इटलीमधील सीरी ए स्पर्धेमधील पाच सामने बंदिस्त मैदानांवर प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. जपान आणि दक्षिण कोरियामधील फुटबॉल स्पर्धानाही याचा फटका बसला आहे. फुटबॉल सामन्यांपेक्षा व्यक्तीचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असते, असे मत इन्फान्टिनो यांनी व्यक्त केले.

पॅरिस अर्धमॅरेथॉन स्पर्धा रद्द

पॅरिस : करोनाच्या भीतीमुळे रविवारी होणारी पॅरिस अर्धमॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागासाठी ४४ हजार धावपटूंनी नावे नोंदवली होती. पाच हजारांहून अधिक नागरिकांना एकत्रित जमता येणार नाही, असा आदेश फ्रान्स सरकारने जारी केल्यामुळे ही स्पर्धा गुंडाळण्यात आली आहे.