सातत्यपूर्ण प्रदर्शनासह चीन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्मक वाटचाल करणाऱ्या भारतीय बॅडमिंटपटूंना उपांत्यपूर्व फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. पी.व्ही. सिंधू, एच.एस. प्रणॉय यांच्यासह ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा पराभूत झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
अव्वल मानांकित चीनच्या चेन लाँगने सातव्या मानांकित प्रणॉयचा २१-१०, २१-१५ असा धुव्वा उडवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चेनने झंझावाती खेळासह प्रणॉयला निष्प्रभ केले. चीनच्या ल्युओ यिंग आणि ल्युओ यू जोडीने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला २१-११, २१-१४ असे नमवले.
‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालच्या अनुपस्थितीत महिला गटात भारताची एकमेव प्रतिनिधी असलेल्या सिंधूने थायलंडच्या पॉर्नटिप ब्युरानप्रासटुस्र्कला जोरदार टक्कर दिली. मात्र पॉर्नटिपने झुंजार खेळ करीत सरशी साधली. पॉर्नटिपने ही लढत २१-१७, २१-१९ अशी जिंकली.
दोन्ही गेम्समध्ये एकेका गुणासाठी कडवी चुरस पाहायला मिळाली. मात्र पॉर्नटिपने चिवटपणे खेळ करीत सिंधूला नामोहरम केले. यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने सिंधूला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. या स्पर्धेत सिंधू जेतेपदाची दावेदार होती. मात्र कामगिरीत सातत्य राखता न आल्याने सिंधूला गाशा गुंडाळावा लागला.