गलवान व्हॅलीत भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सध्या संपूर्ण देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. देशातील अनेक भागांत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. काही भागांमध्ये राजकीय पक्षांनी चिनी मालाची होळीही केली. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र IPL या स्पर्धेला स्पॉन्सरशीपही VIVO ह्या चिनी कंपनीची आहे. देशातलं सध्याचं वातावरण पाहता, बीसीसीायनेही याप्रकरणी सावध भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. पुढील वर्षासाठी बीसीसीआय आपलं स्पॉन्सरशीप संदर्भातल्या धोरणावर विचार करु शकतं, परंतू यंदा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

VIVO कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला आहे. प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४४० कोटी रुपये मिळतात. मिळणारा पैसा चिनी कंपनीकडून येत असला तरीही तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामाला येत असल्याचं धुमाळ म्हणाले. २०२२ मध्ये बीसीसीआय आणि VIVO यांच्यातला करार संपणार आहे. “जेव्हा तुम्ही भावनिक होऊन विचार करता त्यावेळी तर्क आणि विचार मागे पडतात. चिनी कंपनीला पाठींबा देणं आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणं या गोष्टींमधला फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल. चिनी कंपनी भारतात आपलं जे काही उत्पादन विकते. त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा काही भाग ही कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशीपच्या स्वरुपात देते. या स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा पैसा भारताच्याच कामी येत आहे.” धुमाळ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

चिनी कंपन्यांकडून येणाऱ्या पैशातून भारतीय क्रिकेटला फायदा होणार असेल तर याबद्दल काही वावगं वाटायला नको. मी वैय्यक्तीत रित्या चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या समर्थनार्थ आहे. ज्या-ज्या ठिकाणी सरकारला आमची गरज आहे तिकडे आम्ही सरकारसोबत आहोत. बीसीसीआय भारतीय कंपन्यांनाही तितकाच पाठींबा देत. काही वर्षांपूर्वी Appo या कंपनीसोबतचा करार संपल्यानंतर Byju’s या भारतीय कंपनीकडे भारतीय संघाच्या प्रायोजकत्वाचे हक्क देण्यात आले आहेत. बीसीसीआय कोणत्याही पद्धतीने चिनी कंपन्यांना मदत करत नसून, भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या पैशाचा वापर करत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं.