विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

राही सरनोबत, चिंकी यादव आणि मनू भाकर यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात बुधवारी निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर याच तिघींनी गुरुवारी सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या कामगिरीनंतर भारताने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांनिशी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे.

सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने पोलंडचा १७-७ असा धुव्वा उडवला. डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर झालेल्या या अंतिम लढतीत पोलंडच्या जोआनो इवोना वावरझोनोवस्का, ज्युलिटा बोरेक आणि अग्निस्झा कोरेजवो यांना कामगिरी उंचावता आली नाही.

त्याआधी अंजूम मुदगिल, श्रेया सक्सेना आणि गायत्री नित्यनादम यांच्या भारतीय महिला संघाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाला अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारताने ४३ गुण मिळवले. त्याउलट अनेता स्टॅनकिविझ, अलेक्झांड्रा झुटको आणि नतालिया कोचान्स्का यांच्या पोलंड संघाने ४७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. इंडोनेशियाच्या संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.

विद्या रफिका रहमतान तोयिबा तसेच मोनिका दर्यांती आणि ऑड्रेय झहरा धियानिसा यांच्या इंडोनेशिया संघाने हंगेरीच्या ललिता गास्पर, इस्झेर डेनेस आणि लिआ होरवाथ यांच्यावर ४७-४३ अशी मात केली. भारताने या पदकासह ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांची कमाई करत २० गुणांसह पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले आहे.

हंगेरीच्या माघारीमुळे पुरुषांची अंतिम फेरी लांबणीवर

अव्वल नेमबाज पीटर सिडी याच्याशी झालेल्या अंतर्गत वादामुळे हंगेरीने माघार घेतल्याने गुरुवारी रंगणारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील पुरुषांची अंतिम फेरी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता सुवर्णपदकासाठीची ही लढत शुक्रवारी भारत आणि तिसऱ्या क्रमांकावरील अमेरिका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. बुधवारी रंगलेल्या पात्रता फेरीत भारत आणि हंगेरीने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते. अंतिम लढत गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार होती. पण जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला इस्तवान पेनी आणि झवान पेकलर यांनी सिडी याच्यासोबत अंतिम फेरीत लढण्यास नकार दिला. ‘‘हंगेरीच्या संघाने सिडीविरुद्ध बंड पुकारले आहे. हा हंगेरी संघातील अंतर्गत वाद गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू आहे. सिडी आपले म्हणणे खरे करतो, असा या सर्वांचा आक्षेप आहे,’’ असे हंगेरी संघातील एका नेमबाजाने सांगितले.

आता आम्हाला कोणतीही विश्रांती मिळणार नाही. टोक्यो ऑलिम्पिकसाठी आता आमच्याकडे फक्त काही दिवस, काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. ऑलिम्पिकपूर्वी भरपूर स्पर्धाही होणार नाहीत. त्यामुळे येणारी प्रत्येक स्पर्धा ही आमच्यासाठी नवे काही शिकवणारी तसेच आमचे कौशल्य सुधारण्याची संधी देणारी असेल. या स्पर्धेद्वारे आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो.

– राही सरनोबत

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेआधीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होती. त्यामुळे आता आम्हाला राष्ट्रीय स्पर्धांची तयारी करावी लागेल. राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखा बदलल्यास काय करता येईल, याचा विचार करावा लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी  आम्हाला पूर्णपणे सज्ज राहावे लागेल.

– चिंकी यादव