नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फॉम्र्युला-वनचा वेगाचा थरार आणि कानठळ्या बसवणारा आवाज घुमला नसला तरी जेके टायर राष्ट्रीय अजिंक्यपद शर्यतीत कोल्हापूरच्या चित्तेश मंदोडी याने मात्र सर्वाची मने जिंकली. चित्तेशने एलजीबी-४ या मोटारस्पोर्ट्समधील पहिली पायरी मानल्या जाणाऱ्या गटात पहिली शर्यत जिंकल्यानंतर दुसऱ्या शर्यतीत दुसरा येण्याचा मान पटकावला. बंगळुरूच्या अखिल रवींद्रने जेके टायर अजिंक्यपद शर्यतीत बाजी मारली
कोल्हापूरचा युवा ड्रायव्हर असलेल्या चित्तेशने शनिवारी झालेल्या पहिल्या शर्यतीत कट्टर प्रतिस्पर्धी दिलजित सिंगसह अन्य तगडय़ा स्पर्धकांचे आव्हान मोडीत काढत काही सेकंदाच्या फरकाने जेतेपदावर नाव कोरले. मात्र दिवसातील दुसऱ्या शर्यतीत अखेरच्या क्षणी दिलजितने कुरघोडी केल्यामुळे चित्तेशला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दिलजितच्या विजयामुळे एलजीबी-४ गटात ड्रायव्हर्स अजिंक्यपदावर मोहोर उमटवण्यासाठी आता रविवारी खरी चुरस रंगणार आहे. ‘‘प्रत्येक कॉर्नरवर वळणे घेताना मी शर्यतीचा आनंद लुटत होतो. काही वेळा मला अडथळ्यांना सामोरे जावे लागले. दुसरी शर्यत फारच अटीतटीची झाली. प्रत्येक कॉर्नरजवळ दोघांच्या कार जवळ येत होत्या. नशिबाने अपघात होताना वाचला. अखेरच्या फेरीमध्ये माझ्या कारने साथ दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या शर्यतीत मी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानणे पसंत केले,’’ असे चित्तेशने सांगितले.
जेके इंडिया अजिंक्यपद शर्यतीत अखिलला मुंबईचा राहील नूरानी आणि अनंत शामुंघमने कडवी लढत दिली. पण अखेर अखिलने दोन्ही प्रतिस्पध्र्याना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला. राहीलने दुसरे तर अनंतने तिसरे स्थान पटकावले. फोक्सवागेन पोलो आर चषक शर्यतीत नवी दिल्लीच्या ली केशवने बाजी मारली. पोलंडची महिला ड्रायव्हर गोसिया डेस्ट हिने दुसऱ्या तर चेन्नईच्या कार्तिक थरानी याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.