जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू ली चोंग वेई याने चिवट लढतीनंतर जपानच्या केनिची तागो याचा पराभव करीत भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांचे अजिंक्यपद मिळविले. महिलांमध्ये थायलंडच्या राचनोक इन्तानोन हिला विजेतेपद मिळाले.
पुरुषांच्या अंतिम लढतीत चोंग वेई याने एक तास तीन मिनिटांच्या झुंजीनंतर केनिची याला २१-१५, १८-२१, २१-१७ असे पराभूत केले. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला मात्र निर्णायक गेममध्ये वेई याने परतीच्या फटक्यांचा कल्पकतेने उपयोग करीत विजयश्री खेचून आणली.
 जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या इन्तानोन हिने अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीतील चौथी मानांकित ज्युलिया श्रेक हिला २२-२०, २१-१४ असे पराभूत केले. इन्तानोन हिला ज्युलियाने दोन्ही गेम्समध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तिला यश मिळाले नाही.
महिलांच्या दुहेरीत जपानच्या मियुकी माएदा व सातोको सुएत्सेना यांनी अंतिम लढतीत ख्रिस्तिना पेडर्सन व कॅमिला रिटर ज्युएल यांना १२-२१, २३-२१, २१-१८ असे हरवत विजेतेपद मिळविले. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या तोन्तोवी अहमद व लिलियाना नात्सिर यांनी विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण केली.