इंग्लंडचा ख्रिस्तोफर फ्रूम हा शंभराव्या टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यतीचा विजेता ठरला. त्याने या शर्यतीमधील तेरा टप्प्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत वर्चस्व राखले. फ्रूमने विसाव्या टप्प्यातच अन्य खेळाडूंपेक्षा पाच मिनिटांची आघाडी घेत या शर्यतीचे विजेतेपद निश्चित केले होते. २१ वा टप्पा त्याच्यासाठी औपचारिक होता. हा टप्पा प्रथम क्रमांकाने पार करणाऱ्या मार्सेल किटेल याच्यानंतर ५३ सेकंदांनी अंतिम रेषा पार करीत फ्रुमीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हे विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला शेवटचा टप्पा पार करणे अनिवार्य होते. शेवटचा १३३.५ किलोमीटरचा टप्पा त्याने आत्मविश्वासाने पार केला.  फ्रूम हा स्काय संघाचा खेळाडू असून गतवर्षी स्काय क्लबचा तसेच इंग्लंडचा ब्रॅडली व्हिजिन्स याने ही शर्यत जिंकली होती. फ्रूमने एकूण २१०० किलोमीटरचे अंतर ८३ तास ५६ मिनिटांमध्ये पार केले. स्पेनच्या रोजस क्विन्टाना याला दुसरे स्थान मिळाले.
फ्रूमने क्विन्टाना याला चार मिनिटे २० सेकंदांनी हरविले. क्विन्टाना याने पर्वतराजीमधील सर्वात कौशल्यवान खेळाडूचा किताब पटकाविला. ऑलिव्हर रॉड्रिग्ज याने तिसरा क्रमांक मिळविला. अलबर्ट कोन्टाडोर व रोमन क्रेगझिग यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
किटेल याने शेवटच्या टप्प्यात प्रथम स्थान मिळविताना मार्क कॅव्हेंडीश याची सलग चार विजयाची मालिका खंडित केली. २००९ ते २०१२ या कालावधीत कॅव्हेंडीशने या शर्यतीतील शेवटच्या टप्प्यात प्रथम स्थान मिळविले होते. किटेल याच्याबरोबरच आंद्रे ग्रीपेल, मार्क कॅव्हेंडिश, पीटर सॅगन व रॉबर्ट फेरारी यांनी हा टप्पा पार केला. फोटोफिनिशद्वारे किटेल याला प्रथम क्रमांक देण्यात आला.
अल्पाइन पर्वतात झालेल्या या शेवटच्या टप्प्यात सायकलिंग करताना फ्रूमच्या चेहऱ्यावर दमछाक दिसून येत होती मात्र हा टप्पा पूर्ण करण्याच्या निर्धाराने त्याने सायकलिंग केले. पहिल्या पाच स्र्पधकांनी हा टप्पा पार केल्यानंतर त्याने अंतिम रेषा पार केली.
शर्यतीनंतर फ्रूम म्हणाला, ‘‘माझ्यावर उत्तेजक औषधे सेवन केल्याचा आरोप झाला मात्र त्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मी सायकलिंगवरच लक्ष केंद्रीत केल्यामुळेच मला हे यश मिळविता आले. आघाडी स्थानाची जर्सी माझ्याकडे असताना त्या दर्जास साजेशी कामगिरी करीत राहण्याचे माझे ध्येय होते आणि हे ध्येय साकार केल्याचा मला आनंद झाला आहे.’’