आपल्या कारकिर्दीतला ३०० वा वन-डे सामना खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने दुसऱ्या वन-डे सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. ख्रिस गेल वेस्ट इंडिजकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. दुसरा सामना सुरु होण्याआधी गेलला हा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी अवघ्या ७ धावांची गरज होती. याआधी हा विक्रम विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावे जमा होता. लाराने वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार ३४८ धावा केल्या आहेत.

दुसऱ्या सामन्याआधी गेलच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार ३४२ धावांची नोंद होती. लाराचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक असलेल्या ७ धावा पूर्ण करत ख्रिस गेल वेस्ट इंडिजचा वन-डे क्रिकेटमधला सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. याआधी ख्रिस गेलने ब्रायन लाराचाच विंडीजकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम मोडला आहे. लाराने आतापर्यंत २९९ वन-डे सामने खेळले असून, भारताविरुद्धचा दुसरा वन-डे सामना गेलचा ३०० वा वन-डे सामना ठरला.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे विंडीजचे फलंदाज –

१) ख्रिस गेल – १० हजार ३४९ *

२) ब्रायन लारा – १० हजार ३४८

३) शिवनारायण चंद्रपॉल – ८ हजार ७७८

४) डेस्मंड हेन्स – ८ हजार ६४८

५) सर व्हिव रिचर्ड्स – ६ हजार ७२१

अवश्य वाचा – जे कोणालाही जमलं नाही ते गेलने करुन दाखवलं ! भारताविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद