तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळख असलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल सध्या गैरवर्तणुकीमुळे चर्चेचे केंद्रस्थान झाला आहे. एका वाहिनीच्या निवेदिकेशी असभ्य वर्तन केल्याची घटना ताजी असतानाच त्याने संघाचे व्यवस्थापन पाहणाऱया एका ऑस्ट्रेलियन महिला सहकाऱयासोबतही गैरवर्तन केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ड्रेसिंग रुममध्ये गेले असता गेलने कमरेभोवती गुंडाळलेले टॉवेल सोडून गैरवर्तन केल्याची आपबिती ऑस्ट्रेलियन महिलेने तेथील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कथन केली. संबंधित महिला ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी वेस्ट इंडिजच्या संघाचे व्यवस्थापन पाहत होती. ती म्हणाली की, दिवसभरात मी काहीही न खाल्ल्याने खूप भूक लागली होती. त्यामुळे मी वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये गेली. प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याने सर्व खेळाडू मैदानात असतील असा माझा समज झाला. पण त्याचवेळी ख्रिस गेल आणि त्याचा आणखी एक सहकारी ड्रेसिंग रुममध्येच होते. मी खाण्यासाठी काहीतरी शोधत असताना गेलने कमरेभोवती गुंडाळलेले टॉवेल सोडले आणि तुला हेच हवं आहे का? असे निर्लज्जपणे त्याने विचारले. झालेल्या घटनेची मी वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक रिची रिचर्डसन यांनी दिली होती. त्यानंतर आपल्या सर्व खेळाडू आणि सहकाऱयांना ई-मेल करून त्यात आपल्या महिला संघ सहकाऱयांसोबत आदराने वागले पाहिजे, असे रिचर्डसन यांनी बजावले होते.
दरम्यान, गेलने ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्येही एका निवेदिकेशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. ‘मुलाखत संपल्यावर आपण ड्रींकसाठी भेटू, तू लाजू नकोस’, असे गेलने निवेदिकेला लाइव्ह मुलखातीत म्हटले होते. टीकेची झोड उठल्यानंतर गेलने या प्रकरणावर माफी देखील मागितली होती.