निरोपाचा कसोटी सामना खेळण्याच्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या प्रस्तावाला वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) येथे २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला वेस्ट इंडिजच्या १३ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. या मालिकेत अष्टपैलू फिरकी गोलंदाज रहकीम कॉर्नवॉलला पदार्पणाची संधी मिळू शकते.

सहा आठवडय़ांनी वयाची ४० वर्ष पूर्ण करणाऱ्या गेलला २०१४नंतर वेस्ट इंडिजच्या कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यातसुद्धा गेल धावांसाठी झगडताना आढळला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने ४ धावा करण्यासाठी ३१ चेंडू खर्ची घातले.

सबिना पार्क (किंग्स्टन) येथील घरच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळायची संधी मिळावी, अशी इच्छा गेलने भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी प्रकट केली होती. परंतु रॉबर्ट हेन्सच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज निवड समितीने गेलचा प्रस्ताव फेटाळला आहे.

गेलची कसोटी संघात निवड झाल्यास ती वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी अधोगती असेल, अशी प्रतिक्रिया माजी वेगवान गोलंदाज कर्टली अ‍ॅम्ब्रोजने व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, ‘‘गेलने एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० मालिका खेळल्यास काहीच समस्या नाही. परंतु जर त्याला कसोटी सामना खेळायचा असेल, तर माझा नकार असेल. कारण गेल्या पाच वर्षांत तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही.’’

वेस्ट इंडिजचा संघ

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डॉवरिच (यष्टीरक्षक), शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.