वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल याने काही दिवसांपूर्वी सहकारी रामनरेश सरवान याच्यावर ‘करोनापेक्षा भयंकर आणि घातक’ असल्याची टीका केली होती. कॅरेबियन प्रिमीयर लीग (CPL) स्पर्धेत गेलला जमैका तल्हायवाज संघातून सोडचिठ्ठी देण्यात आली. त्यात सरवानचा हात असल्याचा आरोप गेलला आपल्या यू ट्युब चॅनेलवरून व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. मात्र माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवानने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत गेललाच त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली होती. या प्रकरणी ख्रिस गेलवर कारवाई होऊ शकते असे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी दिले.
“फक्त पाच सामने खेळलेल्या क्रिकेटरला वर्ल्ड कपसाठी कसं काय निवडता?”
“सरवानवर गेलने आरोप केल्यानंतर आता CPL व्यवस्थापन आणि गेल यांच्यात नक्कीच या विषयी चर्चा सुरू असेल. प्रत्येक स्पर्धेचे काही नियम असतात, त्याचे पालन होणं आवश्यक आहे. त्यामुळे कदाचित गेलवर कारवाई होऊ शकते. फक्त मला इतकीच भीती आहे की या वादामुळे गेलच्या समृद्ध कारकिर्दीचा अंत होऊ नये. गेलने केलेल्या आरोपांमुळे जे काही प्रकरण घडलं ते वाचून किंवा ऐकून मला निश्चितच आनंद झालेला नाही. गेल CPL मधील एका नव्या संघाशी करारबद्ध आहे. त्यामुळे त्याने स्पर्धेचे नियम पाळणे भाग होते, पण त्याने व्यवस्थापनाला विश्वासात न घेता मुक्तपणे व्यक्त होण्याचा पर्याय निवडला. अशा परिस्थितीत व्यवस्थापन नक्कीच काहीतरी निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. कारण अशा प्रकारच्या आरोपांमुळे स्पर्धा किंवा क्रिकेट बोर्ड बदनाम होतं”, असे स्केरिट म्हणाले.
“गांगुलीला उकसवणं अगदी सोपं”; माजी खेळाडूने सांगितली मैदानावरील भांडणाची आठवण
जमैका तल्हायवाज संघातून गेलला काढण्याचा डाव त्याचा माजी सहकारी रामनरेश सरवान याचाच होता असा दावा गेलने केला. “सध्याच्या घडीला, सरवान, तू करोना व्हायरसपेक्षाही घातक आहेस. तल्हायवाज संघात काय घडलं याची मला चांगलीच कल्पना आहे. कारण त्या संघात तुझ्या मताला खूप किंमत आहे. तुझं तल्हायवाज संघाच्या मालकांशी अगदी घट्टा नातं आहे, याची साऱ्यांनाच कल्पना आहे. आपण दोघं मित्र आहोत असं तू नेहमी म्हणतोस पण मी केलेला साधा फोनही तू उचलत नाहीस. माझ्या मागच्या वाढदिवशी जमैकामध्ये तूच आपल्या संघाबाबत आणि माझ्याबाबत स्टेजवर चढून चांगलं बोलला होतास. पण सरवान, तू साप आहेस हे आता मला कळून चुकलं आहे. तु अजूनही लहान मुलांसारखा अपरिपक्व आहेस. तू अजूनही लोकांच्या पाठीत सुरा खुपसतो आहेस. तू ही गोष्ट कधी बंद करणार आहेस?”, या शब्दात ख्रिस गेलने आपला संताप व्यक्त केला.
“विराट सर्वोत्तम; बाबर आझम आसपासही नाही”; पाकिस्तानी क्रिकेटपटूचं रोखठोक मत
सरवानचं उत्तर
रामनरेश सरवानने हे सर्व आरोप फेटाळून लावत गेलला त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली. “ख्रिस गेलने माझ्यावर लावलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आहेत. माझ्यावरचा एकही आरोप मला मान्य नाही. संघनिवडीच्या किंवा खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या प्रक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. त्याने लावलेले सारे आरोप खोटे असून त्यात त्याने खूप लोकांवर चिखलफेक केली आहे. मी ख्रिस गेलने आरोप केले म्हणून उत्तर देत नाहीये, तर लोकांना खरं काय ते कळावं म्हणून प्रतिक्रीया देतो आहे. मी गेलसोबत संघात खेळलो आहे. मी त्याला कायमच जवळचा मित्र मानतो. त्यामुळेच त्याने केलेले आरोप धक्कादायक आहेत. जेव्हा महिला पत्रकाराबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून गेलवर क्रिकेटबंदी ओढवण्याची शक्यता होती. तेव्हा मी स्वत: त्याच्या बाजूने उभा राहिलो होतो आणि त्याची पाठराखण केली होती, हे चाहत्यांना नक्कीच लक्षात असेल”, अशा शब्दात त्याने गेलला सुनावलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 5:01 pm