IPL स्पर्धा सुरू होण्यासाठी आता महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी सध्या पाकिस्तानमध्ये IPL च्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे. या लीगमधील एक अजब व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत लाहोर कलंदर्स संघातून ख्रिस लिन खेळत आहे. त्याचा बाद झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

लाहोर कलंदर्स आणि पेशावर जल्मी यांच्यात सामना सुरू होता. लाहोर कलंदर्सकडून ख्रिस लिन खेळत होता. पावसामुळे सामना १२-१२ षटकांचा खेळण्यात आला. या सामन्यात लाहोर कलंदर्सला १२ षटकांमध्ये १३३ धावांचे लक्ष्य होते. ख्रिस लिन सलामीवीर फलंदाज होता. त्याने १५ चेंडूंमध्ये दमदार ३० धावा ठोकल्या. पण ग्रेगोरीच्या गोलंदाजीवर तो षटकार मारण्यासाठी पुढे आला आणि हसन अलीने त्याला झेलबाद केले. चांगल्या लयीत असताना बाद झाल्याने तो रागाने लालबुंद झाला. तंबूत परतत असताना त्याने हेल्मेट काढले. त्यावेळी त्याच्या डोक्यातून चक्क वाफा निघाल्याचे दिसून आले.

हा प्रकार नक्की कसा घडला? हे नीट समजू शकलेले नाही. मात्र या प्रकारानंतर फलंदाजाच्या डोक्यातून निघालेल्या वाफा रागाच्या भरात निघाल्या असल्याची भावना नेटिझन्सने व्यक्त केली.