ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्सला लॉर्ड्स कसोटीदरम्यान चक्कर आली होती. यामुळे रॉजर्स दुसऱ्या डावात खेळताना ४९ निवृत्त झाला होता. गंभीर स्वरूपाच्या या दुखापतीमुळे रॉजर्स अ‍ॅशेस मालिकेतील एजबॅस्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात खेळण्याविषयी साशंकता निर्माण झाली होती. मात्र क्ष-किरण चाचणीत ही दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाल्याने रॉजर्स एजबॅस्टन कसोटी खेळण्याची शक्यता वाढली आहे. रॉजर्सने दीडशतकी खेळी करताना स्टीव्हन स्मिथसह केलेली मॅरेथॉन भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया होता.
दोन महिन्यांपूर्वी कॅरेबियन दौऱ्यात रॉजर्सच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. यामुळे त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला होता. मात्र त्यानंतरही तो खेळला होता. दुसऱ्या डावात समोरच्या टोकाला असताना अचानकच रॉजर्सला चक्कर आली आणि तो खाली बसला.
‘‘रॉजर्सच्या कानाला दुखापत झाली आहे. ही दुखापत किरकोळ आहे. त्यासाठी उपचार सुरू झाले आहेत. यासाठी आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. त्याची तब्येत सुधारते आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे क्ष-किरण चाचणीत निष्पन्न झाले आहे. डर्बिशायरविरुद्धच्या सराव सामन्यात तो खेळणार नसल्याने त्याला विश्रांतीसाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे डॉक्टर पीटर ब्रुकनर यांनी सांगितले.
हॅडिन पुनरागमन करणार?
वैयक्तिक कारणांमुळे ब्रॅड हॅडिनने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. हॅडिनच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या पीटर नेव्हिलने यष्टीरक्षण आणि फलंदाजी दोन्ही आघाडय़ांवर चमकदार कामगिरी केली. हॅडिन ऑस्ट्रेलियातून परतला आहे. अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याचे हॅडिनने जाहीर केले आहे. आता एजबॅस्टन कसोटीत कोणाला खेळवायचे हा यक्षप्रश्न निवड समितीसमोर आहे.