इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माजी क्रिकेटपटू ख्रिस सिल्वरवूड यांची इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ट्रेवर बेलिस यांनी अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर राजीनामा दिला होता. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका बजावत असलेल्या सिल्वरवूड यांना मुख्य प्रशिक्षकपदावर बढती दिली आहे. आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि २०११ साली भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांचं नाव इंग्लंडच्या प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होतं, मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना कर्स्टन यांनी इंग्लंडच्या संघासाठी असलेल्या योजनांचं सादरीकरण आवडलं नाही. ज्यामुळे निवड समितीने सिल्वरवूड यांना आपली पसंती दर्शवली.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिल्वरवूड यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.