कसोटी क्रिकेट कारकिर्दीत गोलंदाजाकडून नो बॉल पडला नाही अशी शक्यता फारच विरळ. कपिल देव, इम्रान खान, डेनिस लिली, इयन बॉथम आणि लान्स गिब्स हे असा पराक्रम करणारे महान गोलंदाज होऊन गेले. त्यांनी कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एकही नो-बॉल टाकला नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने तब्बल ८६७ षटके गोलंदाजी केली. पण अखेर कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार २५३ चेंडू टाकल्यानंतर वोक्सने कसोटी कारकिर्दीतील पहिला नो-बॉल टाकला. दुर्दैव म्हणजे त्या चेंडूवर वोक्सला विकेट मिळाली होती, पण पहिल्यावहिल्या नो-बॉलमुळे तो त्या विकेटला मुकला.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेली अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. तर एक सामना अनिर्णित राहिली. मालिकेतील पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या क्रिस वोक्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला नो-बॉल टाकला. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार २५४ वा चेंडू होता. कसोटी कारकिर्दीत वोक्सने पदार्पण केल्यापासून ५ हजार २५३ बॉलमध्ये एकही नो-बॉल टाकला नव्हता. पण वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ३१ व्या षटकात दुसरा चेंडू नो-बॉल टाकला.

वोक्सच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श फलंदाजी करत होता. वोक्सने टाकलेला चेंडू मार्शच्या बॅटला लागून तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला. विकेट मिळाल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. मार्शदेखील पॅव्हेलियनकडे जायला निघाला, त्यावेळी पंचानी त्याला थांबायला सांगितले आणि चेंडूचा रिप्ले बघितला. थर्ड अंपायरकडे विचारणा करता तो चेंडू नो-बॉल असल्याचे स्पष्ट झाले. मार्शला पुन्हा खेळण्यासाठी बोलवण्यात आले. पण वोक्सचं नशीब फुटकं म्हणून त्याने एवढ्या षटकांनंतर नो चेंडू टाकला आणि त्यावरच मार्श बाद झाला.

दरम्यान, वोक्सने ३१ कसोटी सामन्यात ८८ बळी माघारी धाडले. तसेच १ हजार १४५ धावाही केल्या. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय वोक्सने ९९ एकदिवसीय आणि ८ टी २० सामनेही खेळले आहेत.