दक्षिण कोरियाचे अब्जाधीश उद्योगपती चुंग माँग जून यांनीही आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकताना चुंग यांनी मावळते अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यावर टीकेचा भडिमार केला आणि पुढील चार वर्षांत फिफामधील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणार असल्याचा दावाही केला.
‘‘सध्या फिफावर संकटाचे आभाळ कोसळले आहे. या परिस्थितीत संकटांवर मात करणारा आणि संघटनेला पुन्हा उभा करणारा अध्यक्ष हवा,’’ असे मत ६३ वर्षीय माजी उपाध्यक्ष चुंग यांनी पॅरिसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘फिफामध्ये झालेली लाचखोरी लपवून त्याला खतपाणी घालण्याचे काम काही लोकांनी केल्यामुळे आज हे संकट ओढवले आहे. गेली ४० वर्षे एकच व्यक्ती फिफा संघटना चालवत आहे आणि ब्लाटर यांच्यामुळेच ही संघटना भ्रष्टाचाऱ्यांची संघटना बनली आहे.’’
झुरिच येथे स्वित्र्झलड पोलीस अधिकाऱ्यांनी धाड टाकून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर संघटनेची प्रतिमा मलिन झाली. अमेरिकेच्या पोलीस अधिकाऱ्यांना १५० दशलक्ष डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी आरोप दाखल केलेल्या १४ जणांमध्ये या सात अधिकाऱ्यांचा समावेश होता.   ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय फिफा सदस्यांनी घेतला आहे.  या निवडणुकीत विजयी झाल्यास चार वर्षांत फिफाचा कायापालट करण्याचे आश्वासन चुंग यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘चार वर्षांत फिफाचा कायालापालट करणार. फुटबॉल चाहत्यांना माझ्याकडून असे वचन देतो.   प्रतिमा सुधारण्यासाठी पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची आवश्यकता आहे.’’

चौरंगी लढत
चुंग यांच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीमुळे चौरंगी लढत रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याआधी यूएफाचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी, ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको आणि लिबेरियन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख मुसा बिलिटी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.