धारदार आक्रमणाच्या जोरावर गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आशियाई फुटबॉल क्लब स्पर्धेत सिंगापूरच्या वॉरियर्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेला हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. रॉबटरे बेटो याच्यासह मुख्य चार खेळाडूंच्या दुखापतींमुळे चर्चिल ब्रदर्सची बाजू कमकुवत मानली जात होती. मात्र अतिशय कडक उन्हात झालेल्या या सामन्यात चर्चिलपेक्षा वॉरियर्सच्या खेळाडूंची अधिक दमछाक झाली. त्याचा फायदा चर्चिल संघास झाला.
 चर्चिल संघाकडून जेसन वेल्स (३७वे मिनिट), विक्रमजितसिंग (४४वे मिनिट) व सुनील छेत्री (८४वे मिनिट) यांनी गोल केले. पूर्वार्धात त्यांनी २-० अशी आघाडी घेतली होती.
चर्चिल ब्रदर्सचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी एअर इंडियावर ३-० अशी मात केली होती तर सेमेन पडांग संघाला २-२ असे बरोबरीत रोखले होते.
भारतीय संघाचा कर्णधार छेत्री हा चर्चिल ब्रदर्सचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. त्याच्याकडे चेंडू जाणार नाही अशी खबरदारी घेण्यावरच वॉरियर्स संघाचे डावपेच होते मात्र त्यामध्ये त्यांना अपेक्षेइतके यश मिळाले नाही. तरीही खाते उघडण्याकरिता चर्चिल संघास सुरुवातीस झगडावे लागले. ३७व्या मिनिटाला जेसन याला गोल करण्याची हुकमी संधी लाभली. त्याचा फायदा घेत त्याने संघाचा पहिला गोल केला.
 पूर्वार्ध संपण्यापूर्वी शेवटच्या मिनिटाला विक्रमजितसिंग याने चर्चिल संघाचा दुसरा गोल नोंदविला. उत्तरार्धात छेत्री याने सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल करीत संघाची बाजू बळकट केली. हा सामना त्यांनी ३-० असा जिंकला.