आपल्या चेंडूने फिल ह्य़ुजेसचा बळी गेला, या भावनेने वेगवान गोलंदाज सीन अॅबॉट पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला या वेळी आधार द्यायला सारेच सरसावले असून यामध्ये फिलची बहीण मॅगनचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि मानसोपचारतज्ज्ञ अॅबॉटला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून मॅगननेही यामध्ये सहभाग घेतला आहे.
‘‘फिलची बहीण मॅगनने अॅबॉटचे सांत्वन करत समुपदेशन केले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनेही अॅबॉटबरोबर चर्चा करून त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अॅबॉटला येत असलेला अनुभव हा भयावह आणि दु:खद आहे. या सामन्यात मैदानात असलेल्या खेळाडूंना असाच काहीसा अनुभव येत असेल,’’ असे ऑस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर पीटर ब्रुकनेर यांनी सांगितले.
कोणत्याच गोलंदाजाचा फलंदाजाला इजा पोहोचवण्याचा उद्देश नसतो; पण जे झाले ते फार दुर्दैवी असून यासाठी अॅबॉटला दोषी ठरवता येणार नाही.
– ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज