अखेरच्या षटकात १० धावांची आवश्यकता असताना ब्रिस्बेन हीट संघ जिंकणार अशीच चिन्हे दिसत होती. परंतु र्मचट डी लँगेने पहिल्या दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना धावचीत करून सामन्यातील रंगत आणखी वाढवली. शेवटच्या चेंडूवर ब्रिस्बेनला विजयासाठी ५ धावांची गरज होती, तर त्यांची अखेरची जोडी मैदानावर होती. परंतु लँगेने अ‍ॅलिस्टर मॅकडरमॉटचा त्रिफळा उडवून टायटन्सच्या चॅम्पियन्स लीगमधील पहिल्यावहिल्या विजयावर ४ धावांनी निर्विवादपणे शिक्कामोर्तब केले. ४ षटकांत १३ धावांत ३ बळी मिळवणाऱ्या लँगेने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १८.५ षटकांत सर्व बाद १२३ धावा केल्या. हेन्री डेव्हिड्स (३९), हिनो कुन (३१) आणि ए. बी. डी’व्हिलियर्स (२८) वगळता टायटन्सच्या एकाही फलंदाजाला दोन आकडय़ांमध्ये धावा काढता आल्या नाही. ब्रिस्बेनच्या मॅथ्यू गेलने १० धावांत ४ बळी घेतले. ब्रिस्बेनच्या ११९ धावसंख्येत कर्णधार जेम्स होप्सचे सर्वाधिक ३७ धावांचे योगदान होते.