पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत चॅम्पियन्स लीग स्पर्धेत धडक मारणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा साखळी फेरीतच अस्त झाला. बिस्ब्रेन हीटविरुद्धची त्यांची लढत सोमवारी पावसामुळे रद्द झाल्यामुळे हैदराबादचे उपांत्य फेरीत आगेकूच करण्याचे स्वप्न भंगले. हैदराबादला चार लढतींपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला तर दोन लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर एक सामना रद्द झाला.  ‘ब’ गटात चेन्नई सुपर किंग्सने उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच टायटन्स यांच्यात उपांत्य फेरीच्या उर्वरित जागेसाठी चुरस रंगणार आहे.
त्रिनिदादचा टायटन्सवर सहा धावांनी विजय
अहमदाबाद : त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत टायटन्स संघावर डकवर्थ-लुइस नियमाच्या आधारे सहा धावांनी मात करीत आपले स्पध्रेतील आव्हान टिकवण्यात यश मिळवले आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो याचप्रमाणे टायटन्स संघाच्या खात्यावर प्रत्येकी गटात आठ गुण झाले असून, उर्वरित सामन्यांमध्ये आता उपांत्य फेरीचे भवितव्य ठरू शकेल प्रथम फलंदाजी करताना त्रिनिदाद संघाने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या. त्यामध्ये एव्हिन लुइस (७०) व डॅरेन ब्राव्हो (६३) हे चमकले. पावसामुळे खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी टायटन्सच्या १७ षटकांत ६ बाद १५३ धावा झाल्या होत्या. टायटन्स संघाकडून हेन्री डेव्हिस (४२) व जॅक्स रुडॉल्फ (३१) यांनी उपयुक्त फलंदाजी केली.
राजस्थान रॉयल्स-ओटॅगो आमनेसामने
जयपूर :चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेची दिमाखात उपांत्य फेरी गाठणाऱ्या राजस्थान रॉयल्सची शेवटची साखळी लढत ओटॅगोशी होणार आहे. या लढतीत विजयासह उपांत्य फेरीत धडक मारण्याची ओटॅगोही संधी आहे.  नील ब्रूम, ब्रेन्डन मॅक्युल्लम, जेम्स नीशाम, हॅमिश रुदरफोर्ड फॉर्ममध्ये आहेत.