करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. या लॉकडाउनचा फटका क्रीडा विश्वालाही चांगलाच बसला. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद ठेवण्यात आल्या होता. मात्र क्रीडा स्पर्धांवर अवलंबून असलेलं अर्थकारण व सामन्यांअभावी होत असलेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता हळुहळु स्पर्धांना सुरुवात होत आहे. जर्मनीत Bundesliga फुटबॉल स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. याचसोबत गेल्या काही महिन्यांत ठप्प असलेले क्रिकेटचे सामनेही आता सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियात ६ जूनपासून स्थानिक क्लब क्रिकेटच्या सामन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

Darwin and District Cricket T-20 स्पर्धेला ऑस्ट्रेलियात ६ जूनपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेसाठी सरकारने आयोजकांना काही खास नियम आखून दिले आहेत. ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करण्यात मनाई करण्यात आली आहे. याचसोबत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल आयोजकांना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी आयोजक आणखी उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचंही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलंय.

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियन सरकारने लॉकडाउन घोषित केलेलं असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल २८ मे ला आयसीसी बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड आर्थिक संकटात आहे. त्यात वर्षाअखेरीस भारताचा प्रस्तावित दौरा रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार भारतीय संघाला प्रवासाची विशेष परवानगी देण्याचा विचार करत असल्याचंही समजतंय.