सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या घटनेचा मसुदा तयार केला आहे. ११ सप्टेंबरला विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती हा मसुदा सर्वोच्च न्यायालयात सुपूर्द करणार आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि प्रशासकीय समितीचे सदस्य यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत नवीन घटनेविषयी चर्चा करण्यात आल्याचं कळतंय.

“होय, घटनेचा मसुदा तयार करण्याचं आमचं काम पूर्ण झालेलं आहे. हा मसुदा आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द करणार आहोत.” बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विनोद राय यांनी ही माहिती दिली आहे.

अवश्य वाचा – भारतीय क्रिकेटचा ईशान्योदय!, सहा राज्यांचा रणजीमध्ये समावेश

लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनूसार सध्या बीसीसीआयचा कारभार सुरु आहे. बीसीसीआय ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आतापर्यंत तिच्यावर कोणत्याही प्रकारे सरकारी हस्तक्षेप होत नव्हता. मात्र घटनेच्या मसुदाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास, बीसीसीआयच्या मनमानी कारभारावर चाप बसण्याची शक्यता जास्त आहे.

लोढा समितीच्या शिफारसीनूसार, कोलकाता शहरातील ‘नॅशनल क्रिकेट क्लब’ आणि मुंबईतील ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ या दोन संस्था आपला मतदानाचा हक्क आणि पूर्ण सदस्यत्वाचे अधिकार गमावण्याची शक्यता आहे. या दोन संस्थांच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला असता, सर्वोच्च न्यायालय यावर योग्य तो निर्णय घेईल असं विनोद राय यांनी स्पष्ट केलं.