कॅरेबियन बेटांवर पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकून हार पत्करावी लागली होती. यानंतर संघातली अनुभवी खेळाडू मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातला वाद समोर आला होता. मितालीला उपांत्य फेरीसाठी संघातून वगळण्याच्या निर्णयावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. या वादानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीने महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय समितीने सचिन-सौरव आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला महिला संघाचा प्रशिक्षक निवडण्याची विनंती केली आहे.

सचिन-सौरव आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लाग समितीला भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. 2016 साली अनिल कुंबळे आणि त्यानंतर रवी शास्त्रींची नेमणुकही याच समितीने केली होती. त्यामुळे मिताली राज-रमेश पोवार वादानंतर बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीने सावध पवित्रा घेत अनुभवी खेळाडूंवर ही जबाबदारी टाकण्याचं ठरवलेलं दिसतंय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, टॉम मूडी, वेंकटेश प्रसाद आणि डेव्ह व्हॉटमोर यांची नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं समजतंय.