प्रशिक्षक के.आर. नायर यांचे मत
थायलंडमध्ये फडकलेला तिरंगा पाहून मी सुखावलो. कारण भारताची माझ्या प्रशिक्षकपदाखाली झालेली ही दमदार कामगिरी आहे. पुरुषांच्या सांघिक जेतेपदामध्ये तब्बल ४५ देशांमधून भारताने पटकावलेला तिसरा क्रमांक नक्कीच चांगला आहे. आता यापुढे अव्वल क्रमांक पटकावण्याचे आमचे ध्येय असेल. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून खेळाडूंनी मला दिलेली चांगली गुरुदक्षिणा आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक के. आर. नायर यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आम्ही अथक मेहनत घेतली होती. सराव, आहार आणि विश्रांती ही आमच्या यशाची त्रिसूत्री आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शरीरसौष्ठवपटूंचे शरीर घडवताना त्यांची मानसीकताही सक्षम बनवावी लागते. कारण शरीराबरोबरच हा मानसीकतेचाही खेळ आहे. स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धा सुरु असताना काय करायचे, याचा अभ्यास आम्ही केला होता. हाच अभ्यास आम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला, असे नायर सांगत होते.
जेतेपदातील तिसऱ्या क्रमांकाबद्दल ते म्हणाले की, ‘‘भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आम्हाला मिळणारा मान या जेतेपदाने द्विगुणित होईल. देशाचे नाव उंचावण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. भारतामध्ये बऱ्याच भाषा बोलल्या जातात, पण जेव्हा आपण तिरंग्याखाली येतो तेव्हा आम्ही सारे एकच असतो. त्यामुळे देशातील कोणत्याही शरीरसौष्ठवपटूला मार्गदर्शन करताना कोणतीही समस्या जाणवली नाही. सारे शरीरसौष्ठवपटू आणि संघटकांनी मला सहकार्य केल्यामुळेच हे जेतेपद आपण पटकावू शकलो आहोत.

.. तर जगावर राज्य करू

भारतामध्ये दर्जेदार शरीरसौष्ठवपटूंची खाण आहे. पण हे शरीरसौष्ठवपटू बहुतांशी मध्यमवर्गातले आहेत. त्यांना हा खर्च नक्कीच परवडत नाही. कारण आहारासाठीच महिन्यासाठी त्यांना किमान २०-२५ हजारांचा खर्च होतो. घरात अजून कोणी कमावत नसेल तर शरीरसौष्ठव करता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. काही नामांकित व्यक्तींनी चांगल्या शरीरसौष्ठवपटूंना दत्तक घेतले तर आपण जगावर राज्य करू शकू, असे नायर यांनी सांगितले.

भारताला मिळालेली ११ पदके

* सुवर्ण : नितीन म्हात्रे, रॉबी मैतेयी, बॉबी सिंग, अनुपसिंग ठाकूर.
* रौप्य : जगदीश लाड, विपीन पीटर, सागर जाधव, नायक राजकिशोर, यतिंदर सिंग.
* कांस्य : ममता देवी, रोमी सिंग.