विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगली केली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिकाही ५-० ने जिंकली. मात्र या संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडूंचं क्षेत्ररक्षण तितकसं चांगलं राहिलेलं नाही. अनेकदा भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल टाकले, तर अनेकदा ओव्हरथ्रोमुळे एकाच्या जागेवर दोन-तीन धावा दिल्या. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यातही भारतीयांचं क्षेत्ररक्षण यथातथाच होतं. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर संघाच्या या कामगिरीवर खुश नाहीत. दुसऱ्या वन-डे सामन्याआधी भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज असल्याचं श्रीधर यांनी सांगितलं.

“आम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना मुलभूत गोष्टी समजावून सांगत असतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा क्षेत्ररक्षणादरम्यान स्वतः एक कर्णधार असतो. कर्णधार किंवा गोलंदाजाने सांगितल्यानंतर स्वतःची जागा बदलायीच वाट खेळाडूने पाहणं हे अपेक्षितच नाहीये. आम्ही प्रत्येकवेळा खेळाडूंना सांगत असतो की स्वतः कर्णधार असल्यासारखा विचार करा. मैदानात वाऱ्याची दिशा नेमकी कुठून आहे, फलंदाज कोणत्या दिशेला अधिक फटके खेळतोय. आपला गोलंदाज त्याला कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकतोय हे पाहून स्वतःची जागा बदलत चला. गेल्या वर्षी विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्या दौऱ्यातही आमची क्षेत्ररक्षणातली कामगिरी सुमार होती. २०१९ विश्वचषकात आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्या पद्धतीने आम्ही आता खेळ करत नाहीयोत. कदाचीत व्यस्त वेळापत्रक हे कारण असू शकतं पण ही वेळ आता कारणं द्यायची नाहीये. आम्हाला क्षेत्ररक्षणातली आमची कामगिरी सुधारावीच लागेल”, श्रीधर पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

पहिल्या वन-डे सामन्यातही कुलदीप यादवने शतकवीर रॉस टेलरचा झेल टाकला. ज्याचा फायदा घेत टेलरने सामना यजमान संघाच्या बाजूने फिरवला. यावर बोलताना श्रीधर म्हणाले, “माझ्यासाठी ती गोष्ट धक्कादायक होती, अशा गोष्टी होत राहतात…पण याला सबब देऊन चालणार नाही. तो झेल घेतलाच जायला हवा होता. कदाचीत त्यावेळी त्याच्या डोक्यात कुठलातरी दुसरा विचार सुरु असावा…मनिष पांडेसारख्या खेळाडूनेही ओव्हरथ्रोमध्ये काही धावा बहाल केल्या. अशी कामगिरी भारतीय खेळाडूंकडून अजिबात अपेक्षित नाही.” या मालिकेतला दुसरा सामना शनिवारी ऑकलंडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.