शास्त्री यांचा कित्ता गिरवण्याचे वॉशिंग्टनचे ध्येय

नवी दिल्ली : प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वक्तव्य युवा वॉशिंग्टन सुंदरसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळेच ब्रिस्बेनची खेळी त्याच्याकडून साकारली. क्रिकेटमधील कोणत्याही आव्हानासाठी मी सज्ज असून, शास्त्री यांच्याप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर झाल्यास स्वप्नपूर्ती होईल, असे वॉशिंग्टनने सांगितले.

२१ वर्षीय वॉशिंग्टन भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचे प्रतिनिधित्व करायचा, तेव्हा आघाडीच्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखला जायचा. परंतु ऑफ-स्पिन गोलंदाजी हेसुद्धा वैशिष्टय़ त्याने जोपासले होते. याच बळावर त्याने भारताच्या ट्वेन्टी-२० संघामध्ये स्थान मिळवले.

ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीमधील संस्मरणी विजयाबद्दल वॉशिंग्टन म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या डावाला प्रारंभ करण्याची संधी मिळाली, तर माझ्यासाठी ते स्वप्नवत ठरेल. प्रशिक्षक रवी शास्त्री जसे आपल्या कारकीर्दीत सलामीला उतरले, तसेच मलाही सलामीचे आव्हान स्वीकारायला आवडेल.’’

गॅब्बाच्या कसोटीत भारत अडचणीत असताना वॉशिंग्टनने पहिल्या डावात संयमी ६२ धावा आणि दुसऱ्या डावात वेगाने २२ धावा काढल्या. पॅट कमिन्सला हुकद्वारे फटकावलेला षटकार तर डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. याच बळावर भारताने तीन गडी राखून हा सामना जिंकला.

‘‘शास्त्री यांनी त्यांच्या कारकीर्दीतील अतिशय प्रेरणादायी गोष्ट सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या लढतीत विशेषज्ज्ञ गोलंदाज म्हणून खेळताना चार बळी मिळवले आणि १०व्या क्रमांकावर फलंदाजी केली. परंतु कालांतराने ते कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरून जगातील सर्वोत्तम वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना करू लागले,’’ असे वॉशिंग्टनने सांगितले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३२ धावांची फलंदाजीची सरासरी राखली आहे.

‘‘युवा क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवताना अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे ड्रेसिंगरूममध्येही उपलब्ध आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन यांच्या कामगिरीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. हे खेळाडू सदैव मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात,’’ असे वॉशिंग्टन यावेळी म्हणाला.