07 March 2021

News Flash

कोलंबियाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पॅराग्वेवर २-१ अशी मात; कोस्टा रिकाला नमवून अमेरिकेचे पुनरागमन

पॅराग्वेवर २-१ अशी मात; कोस्टा रिकाला नमवून अमेरिकेचे पुनरागमन
जेम्स रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखाली कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या शतकमहोत्सवी वर्षांचे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या कोलंबियाने उपांत्य फेरीत धडक मारली. कार्लोस बाक्का आणि रॉड्रिग्जच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर कोलंबियाने २-१ अशा फरकाने पॅराग्वेवर विजय मिळवला. ‘अ’ गटाच्याच सामन्यात अमेरिकेने ४-० असा कोस्टा रिकाचा पराभव करून आव्हान कायम राखले आहे.
कॅलिफोर्निया येथील रोस बॉल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कोलंबिया विरुद्ध पॅराग्वे या सामन्याला कोलंबियाचे पाठीराखे अधिक होते. स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत यजमान अमेरिकेला धक्का दिल्यानंतर सातत्यपूर्ण खेळ करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने ते बुधवारी मैदानात उतरले. सुरुवातीपासून चेंडूवर ताबा मिळवत त्यांनी पॅराग्वेवर दडपण निर्माण केले. १२व्या मिनिटाला रिअल माद्रिदचा आक्रमणपटू रॉड्रिग्जने दिलेल्या पासवर एसी मिलानच्या बाक्काने अप्रतिम हेडर मारून कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३०व्या मिनिटाला रॉड्रिग्जच्या गोलने ही आघाडी दुप्पट केली.
दुसऱ्या सत्रात मात्र पॅराग्वेने दमदार खेळ करताना कोलंबियासमोर कडवे आव्हान उभे केले होते, परंतु त्यांना गोल करण्यात सातत्याने अपयश आले. अखेर ७१व्या मिनिटाला व्हिक्टर अयालाच्या गोलने पॅराग्वेला विजयाची आस दाखवली. मात्र कोलंबियाची बचावभिंत त्यांना भेदण्यात अपयश आले. कोलंबियाने ‘अ’ गटात दोन विजयांसह अव्वल स्थान कायम राखले आणि स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मानही पटकावला. कोलंबियाने कोपा अमेरिका स्पध्रेच्या मागील नऊ हंगामात ८ वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि केवळ दोन वेळाच त्यांना उपांत्य फेरीत धडक देता आली. यावेळी ते उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करतील की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शनिवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात गटातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी त्यांना कोस्टा रिकाविरुद्ध बरोबरीही पुरेशी आहे, तर अमेरिका आणि पॅराग्वे यांच्या समोर ‘करा किंवा मरा’ असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
अमेरिकेने चुरस वाढवली
उद्घाटनीय सामन्यात कोलंबियाकडून पराभूत झालेल्या यजमान अमेरिकेने दमदार पुनरागमन करताना कोस्टा रिकाचा ४-० असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे अमेरिकेने ‘अ’ गटातील चुरस वाढवली आहे. क्लिंट डेम्पसेने ९व्या मिनिटाला अमेरिकेला आघाडी मिळवून देताना कारकीर्दीतल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली. त्यानंतर जर्मेन जोन्स आणि बॉबी वूड यांनी अनुक्रमे ३७ व ४२व्या मिनिटाला गोल करून मध्यंतराला अमेरिकेला ३-० असे आघाडीवर आणले. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या ग्रॅहम झुसीने (८७ मि.) गोल करत अमेरिकेचा ४-० असा विजय निश्चित केला.
०४
कोपा अमेरिका स्पध्रेत पॅराग्वेविरुद्ध झालेल्या १० पैकी चार सामन्यांत कोलंबियाला विजय मिळवता आला. पाच सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तर एक लढत अनिर्णीत राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:13 am

Web Title: colombia beats paraguay 2 1 at the rose bowl
Next Stories
1 स्पेनला पराभवाचा धक्का
2 आंदोलकांनी युरो चषक अडवला
3 भारतीय खेळाडू तिरंग्याखालीच खेळणार
Just Now!
X