आक्रमणाच्या थराराने रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलंबियाने आयव्हरी कोस्टवर २-१ अशी मात करत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. जेम्स रॉड्रिग्ज आणि ज्युआन क्विंटरो हे युवा शिलेदार कोलंबियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
सलामीच्या लढतीत विजयानिशी यशस्वी सुरुवात करणाऱ्या आयव्हरी कोस्ट आणि कोलंबिया संघांनी या लढतीतही आक्रमक सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला आयव्हरी कोस्टच्या बांबाने दूर अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा ठरला. मग कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. कोलंबियाच्या क्युड्राडोने फ्री किकची संधी वाया घालवली. ६४व्या मिनिटाला क्युड्राडोने दिलेल्या फ्री किकवर जेम्स रॉड्रिग्जने सुरेख गोल करत कोलंबियाचे खाते उघडले. छोटय़ा चणीच्या जेम्सने उंच झेपावत हेडरद्वारे शानदार गोल केला. जेम्सच्या गोलसह कोलंबियाच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. या गोलने आत्मविश्वास उंचावलेल्या कोलंबियातर्फे ज्युआन क्विंटरोने गोल करत आघाडी वाढवली. आयव्हरी कोस्टच्या बचावपटूंकडून चेंडूचा ताबा मिळवत गुटिरेझने चेंडू क्विंटरोकडे सोपवला. त्याने या पासचा उपयोग करत अचूक गोल केला. अचानक दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या आयव्हरी कोस्टला पहिला गोल गेरविन्होने केला. कोलंबियाच्या तीन खेळाडूंना चकवत गेरविन्होने अफलातून गोल केला. बरोबरी करण्यासाठी सरसावलेल्या आयव्हरी कोस्टने जोरदार आक्रमण केले.