उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे आठ महिनांच्या निलंबनाची शिक्षा भोगणारा प्रतिभावान युवा फलंदाज पृथ्वी शॉ लवकरच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी मुंबईच्या संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

१९ वर्षीय पृथ्वीच्या शिक्षेचा कार्यकाळ १५ नोव्हेंबर रोजी संपणार असून त्यानंतरच्या सामन्यांसाठी पृथ्वीला संघात सहभागी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे मुंबई संघाच्या निवड समितीचे प्रमुख मिलिंद रेगे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू भारत-बांगलादेश मालिकेत खेळत असले तरी, ती मालिका संपल्यानंतर त्यांचाही मुंबईच्या संघात समावेश करण्यात येईल, असेही रेगे यांनी सांगितले.

मुंबईने फक्त पहिल्या तीन सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश मालिका संपल्यानंतर आम्ही काही प्रमुख खेळाडूंची मुंबईच्या संघात निवड करू. त्याशिवाय पृथ्वीचे निलंबन संपल्यानंतर लगेचच त्यालाही संघात सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – मिलिंद रेगे, मुंबई संघाचे निवड समिती प्रमुख