इंग्लंडविरूद्धच्या शेवटच्या टी२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने अंतिम षटकात रोमहर्षक विजय मिळवला. विजयासाठी दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि ३ चेंडू राखून पूर्ण केले. सामनावीर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने १९.३ षटकात विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियावरील व्हाईटवॉशची नामुष्की अष्टपैलू मिचेल मार्शने वाचवली आणि संघाची लाज राखली, पण मालिका मात्र इंग्लंडने २-१ने जिंकली.

१४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. मॅथ्यू वेड १४ धावांवर बाद झाला. फिंच आणि स्टॉयनीसने डाव सावरला. त्यांची भागीदारी फुलण्याआधीच आदिल रशीदने खतरनाक असा स्पिन चेंडू टाकला. टप्पा पडून चेंडू इतका पटकन आत वळला की फिंचला काहीही कळलं नाही. त्याने चेंडू हळूवार टोलवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अपेक्षेपेक्षा जास्तच वळला आणि फिंच ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला.

या घटनेनंतर लगेच स्टॉयनीसही २६ धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामनादेखील गमवावा लागणार असे वाटत होते. पण अष्टपैलू मिचेल मार्शने अतिशय समंजसपणे खेळ केला. ३६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह त्याने ३९ धावा केल्या. सामना संपेपर्यंत तो मैदानावर टिकून राहिला आणि त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

त्याआधी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४५ धावा केल्या. टॉम बॅन्टन स्वस्तात बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलानने डाव पुढे नेला. त्या दोघांची जोडी स्थिरावत असतानाच मलान २१ धावांवर बाद झाला. बेअरस्टो शानदार अर्धशतक झळकावले पण तोदेखील ५५ धावांवर माघारी परतला. मोईन अली (२३) आणि जो डेन्टली (नाबाद २९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने १४५ धावांपर्यंत मजल मारली, पण ती धावसंख्या त्यांना विजयासाठी अपुरी पडली.