तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तानने अवघ्या पाच धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. सामन्यात हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतके ठोकली. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या मोईन अलीने एकाकी झुंज दिली, पण अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.

१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या गोटातील खेळाडूंनी मोठी भागीदारी करता आली नाही. सॅम बिलींग्स आणि मोईन अली यांच्यात चांगली भागीदारी झाली. इंग्लंडच्या डावात एक मजेशीर गोष्ट घडली. ११व्या षटकात पाकिस्तानचा फिरकीपटू गोलंदाजी करत होता. मोईन अली त्यावेळी केवळ ७ धावांवर खेळत होता. फिरकीपटूने टाकलेला चेंडू मोईन अलीला समजलाच नाही. त्याने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याला चकवून थेट किपर सर्फराजच्या हातात गेला. सर्फराजला स्टंपिंग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असूनही त्याचा काहीतरी गोंधळ झाला. त्यामुळे अली बऱ्याच वेळाने क्रीजच्या आत आला तरीही त्याने चेंडू स्टपंला लावला नव्हता.

मोईन अलीने १९व्या षटकापर्यंत झुंज दिली. पण अखेर तो ६१ धावांवर बाद झाला. त्यामुळे अखेर इंग्लंडला पाच धावांनी पराभूत व्हावं लागलं.

तत्पूर्वी, पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली आणि हाफीज यांनी धडाकेबाज खेळी केल्या. अलीने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. तर हाफीजने नाबाद राहत ५२ चेंडूत ८६ धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.