इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील साऊथॅम्प्टनचा दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्यात चार दिवस सलग पाऊस पडला. पाचव्या दिवशी मैदान ओले झाल्यामुळे दोन सत्रानंतर खेळ सुरू झाला. पहिल्या डावात पाकिस्तानने २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सामना अनिर्णित होण्यापूर्वी चार गडी गमावून ११० धावा केल्या. जॅक क्रॉलीने अर्धशतक झळकावले. पण सामनावीराचा किताब रिझवानला देण्यात आला.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळात व्यत्यय आला. खेळ थांबण्याआधी पाकिस्तानने ९ बाद २३३ धावा केल्या. त्यात पाकिस्तान ७ बाद १७६ या धावसंख्येवर असताना एक मजेशीर गोष्ट घडली. शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांच्यात धाव घेण्यावरून काहीसा गोंधळ निर्माण झाला. चेंडू रिझवानच्या मांडीला लागून गलीच्या दिशेने गेला. आफ्रिदी धाव घेण्यासाठी पुढे आला पण त्याला धाव नाकारण्यात आली. तितक्यात डॉम सिब्लीने गलीवरून थेट स्टंपवर चेंडू फेकत त्याला धावबाद केले. इतका सारा गोंधळ पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि इतर खेळाडूंना हसू अनावर झालं.

दरम्यान, त्यानंतर तिसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी काही काळ खेळ झाला. पाकिस्तानचा डाव २३६ धावांत संपल्यानंतर सामना संपेपर्यंत सुमारे ४३ षटकांच्या खेळात इंग्लंडने ४ बाद ११० धावा केल्या. जॅक क्रॉलीने ५३ धावा केल्या.