इंग्लंड-पाकिस्तान टी२० मालिकेत यजमानांनी अटीतटीच्या लढतीत पाहुण्यांना पराभूत केले. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-०ची आघाडी घेतली. बाबर आझम, मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला २० षटकात १९६ धावांचे आव्हान दिले होते. इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड मलान यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अर्धशतकी सलामी दिली. टॉम बॅन्टन फटकेबाजी करताना लवकर बाद झाला, पण त्याने लगावलेला एक षटकार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला. इमाद वासिमने टाकलेल्या चेंडूवर बॅन्टनने रिव्हर्स स्वीप मारला. चेंडू हातून सुटताच फलंदाज फिरला आणि त्याने जोरदार षटकार लगावला.

पाहा दमदार षटकार-

सामन्यात जॉनी बेअरस्टोने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मॉर्गन आणि मलान जोडीने दमदार कामगिरी केली. मॉर्गन ६६ धावांवर बाद झाला, पण मलान ५४ धावा करून नाबाद राहिला. ३३ चेंडूत ६६ धावा ठोकणाऱ्या मॉर्गनला सामनावीर घोषित करण्यात आले.

तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने ५६ तर मोहम्मद हाफीजने ६९ धावा केल्या. हाफीजने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. फखर झमाननेदेखील झटपट ३६ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला द्विशतकानजीक पोहोचता आले.