भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. ‘लोकल बॉय’ फिरकीपटू अक्षर पटेलने सहा बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सलामीवीर जॅक क्रॉलीचे अर्धशतक वगळता इतर कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडचा सामन्यातील पहिला गडी घेतला, तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने अक्षरला उत्तम साथ देत तीन बळी टिपले.

Ind vs Eng: राहुल गांधींचा Video पोस्ट करत सेहवागने उडवली इंग्लंडची खिल्ली

कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. डॉम सिबली आणि जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाले. त्यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीने कर्णधार जो रूटच्या साथीने काही काळ डाव सावरला. पण अश्विनने जो रूटचा काटा काढला. रूट बाद झाल्याचे पाहताच विराटने जोरदार जल्लोष केला. त्याच्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये खूप व्हारयल झाला आहे.

Ind vs Eng Video: …अन् अश्विनने उडवला त्रिफळा; फलंदाजही झाला अवाक

दरम्यान, रूट बाद झाल्यावरही जॅक क्रॉलीने दमदार अर्धशतक केलं. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला आणि इंग्लंडच्या डावाला गळती लागली. अष्टपैलू बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले. अखेर बेन फोक्सला माघारी धाडत अक्षरने इंग्लंडचा डाव ११२ धावांवर संपुष्टात आणला.