देशासाठी खेळणार असाल तरच आर्थिक पाठबळ मिळेल, असा फतवा काढत क्रीडा मंत्रालयाने टेनिसपटूंना दिलेला इशारा लिएण्डर पेसला चांगलाच झोंबला आहे. ‘‘मी नेहमीच देशसेवेला पहिली पसंती दिली आहे. स्वत:ऐवजी देशातर्फे खेळण्यास मी प्रथम प्राधान्य दिल्यानंतरही कुणीही माझ्या देशप्रेमाबाबत शंका घेऊ नये. देशाबद्दलची माझी बांधिलकी आजही तशीच आहे,’’ असे भारताचा दुहेरीतील अव्वल टेनिसपटू लिएण्डर पेसने स्पष्ट केले आहे.
‘‘क्रीडा मंत्रालयाबाबतच्या या धोरणाविषयी मला फारशी कल्पना नाही, त्यामुळे मी याविषयी बोलणार नाही. गेली २४ वर्षे देशातर्फे खेळताना मी सहा वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये खेळतानाही मी देशाचेच प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे कुणीही माझ्या देशप्रेमाबाबत शंका घेऊ नये,’’ असे पेसने सांगितले.
क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी पेससह रोहन बोपण्णा आणि सोमदेव देववर्मन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याऐवजी एटीपी टूर स्पर्धामध्ये खेळणे पसंत केले. यावर क्रीडा मंत्रालयाने कुणाचेही नाव न घेता ताशेरे ओढले होते. पेस आणि बोपण्णाची दुहेरी क्रमवारीत अव्वल २५ जणांमधून घसरण झाली आहे. सोमदेवला एकेरीत अव्वल १५० जणांमध्येही स्थान मिळवता आले नाही. क्रमवारीत घसरण होत असताना तिघांचेही कारकीर्द उतरणीला लागली आहे.