भारताच्या खात्यात १६ सुवर्णसह एकूण ४८ पदके

भारताच्या अभिजित गुप्ताने राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील मक्तेदारी कायम राखत बुद्धिबळ विश्वात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अभिजितने अवघ्या २५ मिनिटांत कल्पक खेळ करून २४ व्या चालीअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी आंतरराष्ट्रीय मास्टर अलेक्झांडर वोहलचा नवव्या आणि अंतिम फेरीत दणदणीत पराभव करून जेतेपदाला गवसणी घातली. २७ वर्षीय ग्रँड मास्टर अभिजितने या विजयासह जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. चार पदके पटकावत राष्ट्रकुल स्पध्रेतील सर्वात यशस्वी खेळाडूचा मानही अभिजितने यावेळी पटकावला. याआधी त्याने तीन जेतेपदासह इंग्लंडच्या निगेल शॉर्टशी बरोबरी केली होती. अभिजितने नऊ फेरी अखेरीस ७.५ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले, तर भारताच्याच वैभव सुरी आणि तेजस बाकरेने प्रत्येकी सात गुणांची कमाई केली.

या स्पध्रेत भारताने अपेक्षित कामगिरी करताना १६ सुवर्ण, १६ रौप्य आणि १६ कांस्य अशा एकूण ४८ पदकांची लयलूट केली. महिलांमध्ये स्वाती घाटेने वर्चस्व गाजवले. तिने अंतिम फेरीत कुमार गौरवचा पराभव केला. टाय ब्रेकर लढतीत स्वातीचा खेळ अधिक सुरेख झाला. तिने मेरी अ‍ॅन गोमेज आणि तानिया सचदेव यांच्यवर कुरघोडी केली. तिघींच्या खात्यात प्रत्येकी सहा गुण होते.

गटवार निकाल (गुण)

खुला गट: अभिजित गुप्ता (७.५), वैभव सुरी आणि तेजस बाकरे (प्रत्येकी ७)

महिला : स्वाती घाटे, मेरी अ‍ॅन गोमेज आणि तानिया सचदेव (प्रत्येकी ६)

मुले – २० वर्षांखालील : मोहम्मद नुबैरशाह शेख, शार्दूल गागरे (प्रत्येकी ५.५ गुण), कुशागर क्रिष्णांटर (५); १८ वर्षांखालील : एस. जयकुमार (६.५), अमेय ऑडी (५.५), एस. आधिथ्य (५); १६ वर्षांखालील :  वात्सल सिंघानिया (६), पृथू देशपांडे (५.५), मित्राभा गुहा (५); १४ वर्षांखालील : अर्जुन एरिगैसी, संकल्प गुप्ता (प्रत्येकी ६), आशुतोष बॅनर्जी (५.५); १२ वर्षांखालील : एस. रोहित कृष्णा (६.५), आदर्श त्रिपाठी व श्रीश्वन मरालक्षीकारी (५.५); १० वर्षांखालील : राहिल मुळीक, सोयामश्री मोहंती (प्रत्येकी ६ ), भाविक अहुजा (५.५); ८ वर्षांखालील : श्रीअंश दास (६), रेजा नीर मेनन (बांगलादेश) आणि के. साई तनिष (प्रत्येकी ५.५)

मुली : २० वर्षांखालील : अर्पिता मुखर्जी (६), प्रणाली धारिया व साक्षी चितलांगे (प्रत्येकी ५); १८ वर्षांखालील : आकांक्षा हगवणे (६), अनन्या सुरेश (५.५), चंद्रेयी हज्रा; १६ वर्षांखालील : प्रियांका, समृद्धा घोष व व्ही. तोशाली (प्रत्येकी ५.५); १४ वर्षांखालील : सानिया सलोनिका (६), एल. ज्योत्स्ना (५.५), डी. जिशिथा (५), १२ वर्षांखालील : दिव्या देशपांडे (६.५), भाग्यश्री पाटील आणि ध्याना पटेल (प्रत्येकी ५.५); १० वर्षांखालील : एम. साहिथी वर्षिणी (६), स्निथीया सरकार व सविता श्री (प्रत्येकी ५.५); ८ वर्षांखालील : ए. एन. शेफाली (६), हिया पांचाळ व सुहानी लोहिया (प्रत्येकी ५.५).

वरिष्ठ (६० वर्षांवरील) : हनिफ मोल्लाह (बांगलादेश ४), वझीर अहमद खान (भारत) आणि लिम कियान वा (मलेशिया) (प्रत्येकी ३.५)

  • १२ : राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा अभिजित हा बारावा भारतीय खेळाडू ठरला आहे. १९८५ साली लंडन येथे झालेल्या स्पर्धेत प्रवीण ठिपसे हे भारताकडून पहिले जेतेपद पटकावणारे खेळाडू ठरले होते.