रविवार विशेष

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धासाठी आपली किती तयारी झाली आहे याची चाचपणी करण्याची संधी भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेद्वारे मिळत असते. दुर्दैवाने भारताला या स्पर्धेतही अपेक्षेइतके यश मिळवता आलेले नाही. यंदा ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. तसेच २०२० मध्ये टोकियोत ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. त्यादृष्टीने आतापासून संभाव्य पदक विजेत्या खेळाडूंची कसोटी आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत पाहायला मिळणार आहे.

आशियाई स्पर्धेच्या तुलनेत राष्ट्रकुलचा दर्जा दुय्यम मानला जात असला तरीही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांच्या संभाव्य ऑलिम्पिकपटूंशी दोन हात करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळत असते. गेल्या दोन वर्षांमध्ये बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती आदी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली लक्षणीय कामगिरी लक्षात घेतली, तर यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कामगिरीत भारतीय खेळाडू सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे. सुशील कुमार, साक्षी मलिक (कुस्ती), पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत (बॅडमिंटन), नीरज चोप्रा, तेजिंदरपाल सिंग, अर्पिदर सिंग, सीमा अंतील (अ‍ॅथलेटिक्स), एम.सी. मेरी कोम, एल. सरिता देवी, मनोज कुमार, विकास कृष्णन, गौरव सोळंकी (बॉक्सिंग), वीरधवल खाडे (जलतरण), अरुणा रेड्डी, आशीषकुमार (जिम्नॅस्टिक्स), सतीश शिवलिंगम, विकास ठाकूर, सैकोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) यांच्यावर भारताच्या सोनेरी कामगिरीची मुख्य मदार आहे.

बॉक्सिंग व जिम्नॅस्टिक्समध्ये प्रगतीची अपेक्षा

बॉक्सिंगमध्ये यंदा प्रगतीची अपेक्षा आहे. कारण गेल्या दीड वर्षांत भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा ते कसे घेतात हीच उत्कंठा आहे. मेरी कोम, सरिता देवी, विकास कृष्णन यांच्याबरोबरच मनीष कौशिक, सतीशकुमार हे पदक मिळवतील असा अंदाज आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये आशिषकुमारने २०१० मध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली होती. अलीकडे दीपा कर्माकरच्या अनुपस्थितीत अरुणा रेड्डी हिने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत भारतीय जिम्नॅस्टिक्समध्ये नवा इतिहास घडवला. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. दीपाच्या अनुपस्थितीत तिच्यावर मोठी मदार आहे.

बॅडमिंटनमध्ये सोनेरी कामगिरीची आशा

बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर चीनच्या मक्तेदारीला शह देण्याचे काम भारतीय खेळाडूंनी केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत चीनचा समावेश नसतो. मात्र कॅनडा, मलेशिया आदी देशांच्या खेळाडूंचे आव्हान भारतीय खेळाडूंपुढे असणार आहे. तरीही ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू, कांस्यपदक विजेती सायना, श्रीकांत यांच्याकडून सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे. एकेरीत उदयोन्मुख खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेली जी. ऋत्विका शिवानीलादेखील पदकाची संधी आहे. दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीत ज्वाला गट्टा नसणार आहे. तिच्याऐवजी एन. सिक्की रेड्डीच्या साथीत अश्विनी उतरली आहे.

नेमबाजीत वर्चस्वाची संधी

नेमबाजी हा भारतासाठी पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारतीय नेमबाजांना परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्याची भरपूर संधी मिळत आहे. केंद्र शासनाकडूनही भरघोस मदत त्यांना मिळत आहे. दारूगोळा व अन्य सामग्रीबाबत त्यांच्या समस्या दूर झाल्या आहेत. अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंकडूनही सातत्यपूर्ण कामगिरी होत असल्यामुळे भारताने या क्रीडा प्रकारात वर्चस्व गाजविले तर ते नवल वाटणार नाही. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, संजीव रजपूत, मानवजितसिंग संधू, जितू राय, हीना सिधू, तेजस्विनी सावंत या अनुभवी खेळाडूंबरोबरच ओमप्रकाश, मनू भाकेर, अंजूम मुदगिल, मेहुली घोष, शिराज शेख या युवा खेळाडूंना पदार्पणातच आपले सर्वोत्तम कौशल्य दाखविण्यासाठी संधी आहे. भाकेर, ओमप्रकाश, मेहुली आदी खेळाडूंनी यंदाच्या मोसमातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धाच्या मालिकेतील दोन स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्याची पुनरावृत्ती करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

नीरज, सीमा व तेजिंदरकडून मोठी अपेक्षा

नीरज चोप्रा (भालाफेक), सीमा अंतील (थाळीफेक), तेजिंदरपालसिंग (गोळाफेक) या खेळाडूंना अ‍ॅथलेटिक्समधील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव आहे. नीरज व सीमा हे अनेक वेळा परदेशातील सराव शिबिरात भाग घेत असल्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा ते घेतील अशी अपेक्षा आहे. अर्पिदरपालसिंग याने गतवेळी तिहेरी उडीत कांस्यपदक मिळवले होते. तसेच त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक व आशियाई इनडोअर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. जिन्सन जॉन्सनने आशियाई स्पर्धेतील ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे. महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये पूर्णिमा हेम्बरामला चांगले यश मिळवण्याची संधी आहे. महिलांच्या चार बाय ४०० मीटर्स रिले शर्यतीत भारतीय संघ आशियाई व राष्ट्रकुल स्तरावर अव्वल दर्जाचा संघ मानला जातो. हे स्थान यंदाचा भारतीय संघ कसे सार्थ ठरवतो हीच उत्सुकता आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदी देशांचे भारताला मुख्य आव्हान असणार आहे.

कुस्तीमध्ये ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक विजेती सुशीलकुमार, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबरच मोसम खत्री, सोमवीर, बबीता, विनेश यांच्याकडून पदक अपेक्षित आहे. सौरव घोषाल, दीपिका पल्लिकल, जोत्स्ना चिनप्पा (स्क्वॉश), दीपक लथार, पूनम यादव, के. संजीता चानू, (वेटलिफ्टिंग), अचंता शरथ कमाल (टेबल टेनिस) हे पदकांच्या मानकऱ्यांमध्ये दिसतील अशी आशा आहे. सांघिक क्रीडा प्रकारात हॉकीत भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. मात्र पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याच्या तंत्रात ते कशी सुधारणा दाखवितात हीच उत्सुकता आहे. आशियाई क्रीडा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाची रंगीत तालीम म्हणूनच भारतीय खेळाडूंची राष्ट्रकुल स्पर्धेत सत्त्वपरीक्षा असणार आहे.

मिलिंद ढमढेरे, milind.dhamdhere@expressindia.com