26 September 2020

News Flash

सावध ऐका पुढल्या हाका!

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या यशाचे श्रेय अर्थात युवा खेळाडूंचे.

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या यशाचे श्रेय अर्थात युवा खेळाडूंचे. राष्ट्रकुलमध्ये भारताने पदकांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. म्हणजे दिल्ली (१०१) व मँचेस्टर (६९) पाठोपाठ भारताची गोल्ड कोस्ट येथील कामगिरी उल्लेखनीय झाली. ग्लासगोच्या तुलनेत यंदा सुवर्णपदकांची संख्या ११ने वाढवली, ही भारतासाठी खरेच खूप कौतुकाची बाब आहे. पण राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यात असलेली आव्हाने लक्षात घेता, या कामगिरीचे विश्लेषण डोळसपणे करायला हवे.

राष्ट्रकुलपाठोपाठ येणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खरी क्षमता कळते. चीन, जपान, दक्षिण कोरिया व इराण या क्रीडा महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांसमोर आपण किती खुजे आहोत, हे कळून चुकते. आणि पुन्हा विचारमंथनात पुढील चार वष्रे जातात.. मग मागचा पाढा पुढे.. अशीच स्थिती सुरू आहे. ब्रिटिशांनी राज्य केलेल्या देशांमध्ये होणारी राष्ट्रकुल स्पर्धा ही लुटुपुटूचीच लढाई होती, परंतु यात सहभागी होणाऱ्या देशांची कामगिरी उत्तरोतर वाढत गेलेली आहे. त्याची प्रचीती आपल्याला राष्ट्रकुल स्पर्धामध्ये येतच असते. आशियाई आणि ऑलिम्पिक यांचा स्तर आणि सहभागी देशांची यादी पाहिल्यास भारत किती पिछाडीवर आहे, याची पदोपदी जाण होईलच.

राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीनंतर ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. गोल्ड कोस्ट येथे वेटलिफ्टिंग, नेमबाज, टेबल टेनिस, बॉक्सिंग, स्क्वॉश, बॅडमिंटन या खेळांमध्ये आपली कामगिरी उंचावली. त्याच वेळी अ‍ॅथलेटिक्समध्येही नीरज चोप्रा, सीमा पुनिया, नवजीत ढिल्लन, जिन्सन जॉन्सन, मोहम्मद अनास, हिमा दास आणि एल. सुरिया यांनी छाप पाडली. आशियाई स्पर्धेत भारताला सर्वाधिक ७४ पदके ही अ‍ॅथलेटिक्स प्रकारात मिळाली आहेत आणि त्यामुळे राष्ट्रकुलच्या युवा खेळाडूंच्या प्रदर्शनाने अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र नीरजने ८६.४७ मीटर भालाफेक करून येथे मिळवलेले सुवर्णपदक आशियाई स्पर्धेत मिळवण्यासाठी त्याला ९० मीटर अंतर पार करावे लागेल. याची जाण त्यालाही आहे आणि म्हणूनच त्याने तसा निर्धार बोलून दाखवला. सीमा आणि नवजीत यांनी अनुक्रमे ६०.४१ व ५७.४३ मीटर थाळीफेक केली. आशियाई स्पर्धेतील विक्रम हा ६६.१८ मीटरचा आहे आणि यावरून त्यांना किती मेहनत घ्यावी लागेल, हे लक्षात येतेच. चीन व जपान यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये अनुक्रमे ३०० व १५१ सुवर्णपदके जिंकलेली आहेत आणि आपण अद्याप शंभरीच्या आसपास पोहचलेलो नाही.

नेमबाजीत मनू भाकर, अनीष भानवाला व मेहुली घोष ही युवा पिढी जकार्ता येथे आपला दबदबा निर्माण करण्यासाठी समर्थ आहेत. त्यांच्यासमोर प्रामुख्याने चीन, कोरिया यांचे आव्हान असेल. टेबल टेनिसमध्ये भारतीयांच्या कामगिरीचा आलेख प्रचंड चढा राहिला असला तरी आशियाई स्पर्धेत ती कामगिरी करणे सोपी गोष्ट नाही. आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला अव्वल तीनपर्यंत पोहचण्यासाठी चीन, जपान आणि कोरियाचे आव्हान पेलावे लागेल. बॅडमिंटनमध्ये आपली प्रचंड प्रगती झाली असली तरी आशियाई स्पर्धेत अवधी आठ कांस्यपदके ही आजवरची कमाई आहे. याउलट राष्ट्रकुलमध्ये आपण एकूण २५ पदके जिंकली आहेत. स्क्वॉशमध्ये परिस्थिती किंचितशी चांगली आहे. येथे राष्ट्रकुलपेक्षा जास्त पदके आशियाई स्पर्धेत भारताच्या नावे आहेत.

वेटलिफ्टिंगमध्ये आपल्या आशा अधिक उंचावल्या आहेत, परंतु येथेही आकडेवारीत आपल्या खेळाडूंना बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. मीराबाई चानू, संजिता चानू, पूनम यादव, सतीशकुमार शिवालिंगम आणि वेंकट राहुल रगाला यांनी राष्ट्रकुलमध्ये जितका भार उचलून सुवर्णपदकं जिंकली त्या भारात आशियाई स्पर्धेत कांस्यपदकही मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या वाढली, पदकतालिकेत आघाडी घेतली, यात तथ्य असले तरी या पदकविजेत्या खेळाडूंची पुढील वाटचाल कशी होते, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रकुलमध्ये जिंकलेल्या एकूण ६६ पदकांमध्ये तरुणांचा वाटा जवळपास ३८ टक्के आहे आणि हा वर्ग २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायलाच हवे, परंतु सोबत त्यांना पुढील आव्हानांची जाण करून द्यायला हवी. अन्यथा राष्ट्रकुल पदकविजेते एवढाच टिळा लावून मिरवणारे आपल्याकडे असंख्य खेळाडू आहेत.

– स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:46 am

Web Title: commonwealth games 2018 2
Next Stories
1 डी’व्हिलियर्सची आतषबाजी!
2 अर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा
3 डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली
Just Now!
X