अनुकूल कार्यक्रम पत्रिकेमुळे पदकांची संधी अधिक; पदकासाठी मेरी कोमला एकच विजय अनिवार्य

जागतिक व ऑलिम्पिक पदकांसह आपल्या नावावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे पदक जमा करण्यासाठी भारताची ‘सुपरमॉम’ एम.सी. मेरी कोमला केवळ एकच लढत जिंकणे अनिवार्य आहे. बॉक्सिंगमधील लढतींची कार्यक्रम पत्रिका मंगळवारी येथे निश्चित झाली असून भारतीय खेळाडूंसाठी सोपी परीक्षा असणार आहे. बॅडमिंटनमध्येही भारतासाठी अनुकूल कार्यक्रम पत्रिका आहे.

मेरी कोमला ४८ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या मिगान गॉर्डनशी खेळावे लागणार आहे. ही लढत जिंकली की मेरी कोमचे पदक निश्चित होईल. ऑलिम्पिक कांस्यपदक व जागतिक विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे. ग्लासगो येथे चार वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी पिंकी जांगराला ५१ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले असून तिच्यापुढे इंग्लंडच्या लिसा व्हाईटहेडचे आव्हान असणार आहे. ६९ किलो गटात भारताच्या लवलिना बोगरेहेनला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असून तेथे तिची इंग्लंडच्या सँडी रियानशी झुंज होईल. माजी विश्व व आशियाई विजेती एल. सरिता देवीची (६० किलो) किम्बर्ली गिटेन्सशी झुंज होईल.

विकास कृष्णनला पुरुषांच्या ७५ किलो गटात पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. त्याला थेट उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे. ६० किलो गटातही मनीष कौशिकला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. माजी आशियाई क्रीडा स्पर्धा कांस्यपदक विजेता सतीश कुमारलाही ९१ किलो गटात थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. युवा खेळाडू नमन तन्वरला ९१ किलो गटाच्या पहिल्या फेरीत टांझानियाच्या हरुन महंदोशी गाठ पडेल. ६९ किलो गटात मनोज कुमारपुढे नायजेरियाच्या ओसिता उमेहचे आव्हान असणार आहे. ५६ किलो गटात महम्मद हुसामुद्दिनला बोई वारावोराशी लढत द्यावी लागणार आहे. गौरव सोळंकीची घानाच्या अनांग अम्पियासबरोबर लढत होईल. अमित पंघलला ४९ किलो गटात घानाच्या टेटी  सुलेमानूशी खेळावे लागेल.

श्रीकांत व सिंधू यांना अग्रमानांकन

राष्ट्रकुल विजेतेपदाचे दावेदार मानले गेलेले किदम्बी श्रीकांत व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू यांना बॅडमिंटनमधील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत अग्रमानांकन मिळाले आहे. बॅडमिंटनच्या सामन्यांना १० एप्रिलपासून सुरुवात होईल.

जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानचा खेळाडू श्रीकांतला फिजी देशाच्या लिआम फोंगशी खेळावे लागणार आहे. एच.एस. प्रणॉय याला तिसरे मानांकन मिळाले असून पहिल्या फेरीत त्याला पुढे चाल देण्यात आली आहे. दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी व सात्विकसाई रान्किरेड्डी यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून दुसऱ्या फेरीत तिची झोई मॉरिसशी गाठ पडेल. उपांत्य फेरीत तिची गतवेळची विजेती मिशेली ली हिच्याशी लढत होण्याची शक्यता आहे. माजी विजेती सायना नेहवालला द्वितीय मानांकन मिळाले असून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे एल्सी डीव्हिलियर्सचे आव्हान आहे. जी. ऋत्विका शिवानीला आठवे मानांकन मिळाले आहे.

मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांना थेट दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले आहे. रान्किरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या लढतीत हार्डी स्टुअर्ट व क्लोई ली तिसियर यांच्याशी खेळावे लागेल. महिला दुहेरीत सिक्की व अश्विनी यांना द्वितीय मानांकन मिळाले असून पहिल्या फेरीत त्यांना पुढे चाल मिळाली आहे.

बॅडमिंटनमध्ये सव्‍‌र्हिसबाबत जुनेच नियम वापरणार

जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने सव्‍‌र्हिसबाबत नवीन नियमावली अमलात आणली असली तरी येथे मात्र जुन्याच नियमावलीचा उपयोग केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेच्या वेळी नवीन नियमावलीचा उपयोग करण्यात आला होता. या नवीन नियमावलीबाबत भारतीय खेळाडूंसह अनेक खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीने बॅडमिंटन महासंघाबरोबर चर्चा करून जुनीच नियमावली वापरण्याबाबत परवानगी घेतली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंसह अनेक खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

थेट प्रक्षेपण

उद्घाटन सोहळा

  • वेळ : दुपारी ३.१५ वा.
  • प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन २, सोनी टेन ३

केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे भाषण

  • वेळ : रात्री ९ वा.
  • प्रक्षेपण : सोनी सिक्स