ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या पहिल्या दिवशी, भारताच्या गुरुराजाने ५६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. या विजयानंतर संपूर्ण देशभरात त्याच्या कामगिरीची प्रशंसा करण्यात येत आहे. अनेक खेळाडू व राजकारण्यांनी ट्विटर अकाऊंटवर गुरुराजाच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया – भारताचं खातं उघडलं, गुरुराजाला वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक

पहिल्याच दिवशी गुरुराजाने भारताला रौप्यपदकाची कमाई करुन दिलेली असली, तरीही त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. ३ प्रयत्नांपैकी पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये गुरुराजाला अपयश आलं. त्यामुळे जवळपास स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या गुरुराजाला त्याच्या प्रशिक्षकांनी मोलाची सुचना केली. “तुझ्या या एका प्रयत्नावर तुझी संपूर्ण कारकिर्द कशी असेल हे ठरणार आहे.” प्रशिक्षकांच्या या शब्दांनंतर माझ्या मनात देशाचा आणि माझ्या परिवाराचा विचार आला. त्यामुळे देशवासियांना निराश करायचं नाही हा विचार मनात घेऊनच मी मैदानात उतरल्याचं गुरुराजाने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ३ प्रयत्नांमध्ये मिळून गुरुराजाने २४९ किलो वजन उचललं.

“२०१० साली मी सर्वप्रथम सरावाला सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या महिन्यांमध्ये मी प्रचंड वैतागून गेलो होतो. वेटलिफ्टींगमध्ये बार कसा उचलायचा हे देखील मला कळतं नव्हतं. प्रत्येक वेळी मी प्रयत्न करायला जायचो, पण मला तो प्रचंड जड वाटायचा. २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा प्रकारामध्ये मी सुशील कुमारला कुस्ती खेळताना पाहिलं होतं. यानंतर मलाही कुस्ती खेळायची होती. मात्र माझे प्रशिक्षक राजेंद्र प्रसाद यांनी मला वेटलिफ्टींगकडे वळवलं.” आपल्या पदकापर्यंतच्या प्रवासाविषयी बोलत असताना गुरुराजाने माहिती दिली.

वेटलिफ्टींमध्ये पदक मिळवलं असलं तरीही गुरुराजाचं कुस्तीबद्दलचं प्रेम अजुनही ताजं आहे. मला अजुनही कुस्ती खेळायला आवडत असल्याचं सांगत गुरुराजाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रकुल विजयानंतर आपल्याला ऑलिम्पिकसाठी तयारी करायची असल्याचं गुरुराजाने स्पष्ट केलं. ऑलिम्पिकसाठी संघटनेकडून मिळणारी मदत आणि देशवासियांचा पाठींबा अतिशय महत्वाचा असल्याचंही गुरुराज म्हणाला.

अवश्य वाचा – ट्रकचालकाच्या मुलाने पटकावलं भारतासाठी पहिलं पदक, गुरुराजाची धडाकेबाज कामगिरी