भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वेल्स संघाने भारताचा ३-२ गोलने पराभव केला. महिला हॉकी स्पर्धेच्या इतिहासात वेल्स संघाकडून पराभूत होण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. तब्बल १५ पेनल्टी कॉर्नर मिळूनही भारतीय महिला खेळाडुंना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सुरूवातीला वेल्स संघाने २-० ने आघाडी घेतली होती. नंतरच्या टप्प्यात अवघ्या काही मिनिटांत भारताने दोन गोल करून बरोबरी साधली. राणी रामपालच्या चमकदार खेळीने भारताला हे गोल करता आले. परंतु, भारताने गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या व भारताचा पराभव झाला.

सामन्याच्या सुरूवातीपासून वेल्स संघाने आक्रमक धोरण स्वीकारले होते. आक्रमक खेळाच्या जोरावर त्यांनी दोन गोल केले. सुरूवातीच्या टप्प्यात नवज्योत कौरला गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतु, चेंडु व्यवस्थित न हाताळल्यामुळे गोलची संधी थोडक्यात हुकली. भारताला एकामागोमाग एक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण एका गोलचा अपवाद वगळता सर्व पेनल्टी कॉर्नर वाया गेले. पाचव्या पेनल्टी कॉर्नरला राणी रामपालने पहिला गोल केला. दुसरा गोलही राणी रामपालनेच करून संघाला बरोबरी साधून दिली.

शेवटच्या क्षणी वेल्स संघाच्या नताशाने जबरदस्त गोल करत संघाला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली नाही. हा सामना अ गटातला होता. शुक्रवारी भारताचा सामना मलेशियाबरोबर तर वेल्सचा इंग्लंड संघाबरोबर होणार आहे. जागतिक क्रमवारीत वेल्स ३० व्या तर भारताचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.