ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने आज १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताची सर्वात अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. तर गोलकीपर सविताकडे संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय महिला संघाची अ गटात वर्णी लागलेली आहे. या गटात भारताला मलेशिया, वेल्स, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांशी सामना करायचा आहे. भारतीय महिलांचा सलामीचा सामना ५ एप्रिलरोजी वेल्सच्या संघाविरुद्ध होणार आहे.

दक्षिण कोरिया दौऱ्यात विश्रांती दिलेल्या गोलकीपर सविताने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघात पुनरागमन केलं आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी भारतीय महिलांचा संघ मोठ्या संघांना चकीत करु शकतो असा विश्वास वर्तवला आहे. काल हॉकी इंडियाने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष संघाचीही घोषणा केली होती.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय हॉकी संघाची घोषणा, सरदार सिंहला वगळलं

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ –

गोलकीपर – सविता (उप-कर्णधार), रजनी इटीमार्पू

बचावफळी – दिपीका, सुनिता लाक्रा, दिप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, सुशीला चानू

मधली फळी – मोनिका, नमिता टोपो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलीमा मिन्झ

आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लारेमिसामी, नवज्योत कौर, नवनीत कौर, पुनम राणी