राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने लागोपाठ पदकांची कमाई केली आहे. ६९ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या पुनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या क्रीडा प्रकारात पुनमने ही आश्वासक कामगिरी केली आहे. यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या नेमबाजांनी आपल्या पदकांचं खातं उघडलं. मनु भाकेर आणि हिना सिद्धु यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई करत भारतीयांचा रविवार खऱ्या अर्थाने सार्थकी लावला आहे.

यानंतर बराच काळ भारतीय खेळाडूंना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या रवी कुमारला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारनेही चांगली झुंज दिली होती, मात्र त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यानंतर भारतीय बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत प्रवेश करत भारताचं आणखी एक पदक निश्चीत केलं. यानंतर ९४ किलो वजनी गटात भारताच्या विकास ठाकूरलाही सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. विकासलाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. अखेरीस दिवस संपत असताना भारतीय महिला टेबल टेनिस संघाने अंतिम फेरीत सिंगापूरवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय महिलांनी केलेली ही कामगिरी विक्रमी मानली जात आहे. मोनिका बत्राने अंतिम फेरीत धडाकेबाज खेळ करत आपल्या संघाचं सुवर्णपदक निश्चीत केलं.

  • अटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर ४-३ ने मात
  • भारतीय पुरुष हॉकी संघाचा राष्ट्रकुल स्पर्धेतला पहिला विजय
  • बास्केटबॉल, सायकलिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा
  • थोड्या फरकाने भारताचं नेमबाजीतलं पदक हुकलं
  • स्किट नेमबाजी प्रकारात अटीतटीच्या लढाईत भारताची सानिया शेख अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर
  • वेटलिफ्टर्सकडून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाचं दान
  • ९४ किलो वजनी गटात भारताच्या विकास ठाकूरला कांस्यपदक
  • बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारताची अंतिम फेरीत धडक, सिंगापूरवर केली मात
  • टेबल टेनिस – भारतीय महिलांची उपांत्य फेरीत इंग्लंडवर मात, अंतिम फेरीत प्रवेश
  • भारताचा विकास कृष्णन बॉक्सिंमध्ये पुढच्या फेरीत, ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर केली मात
  • अखेर भारताच्या रवी कुमारला कांस्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर
  • अटीतटीच्या लढाईत भारताचा दिपक कुमार स्पर्धेबाहेर
  • १०. मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दिपक आणि रवी कुमारकडून कडवी झुंज
  • मेरी कोम बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत, भारताचं किमान १ कांस्यपदक निश्चीत
  • महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कोम विजयी, पुढच्या फेरीत प्रवेश
  • अन्य खेळांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची इंग्लंडवर २-१ ने मात
  • आतापर्यंत भारताच्या खात्यात ६ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक
  • १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताची मनु भाकेर आणि हिना सिद्धुला अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक
  • दुसरीकडे भारतीय नेमबाजपटूंनी गोल्ड कोस्टमध्ये आपलं खातं उघडलं
  • वेटलिफ्टर्सकडून भारताच्या पदरात पाच सुवर्णपदकांचं दान, भारताची ७ पदकं वेटलिफ्टींगमधूनच
  • ६९ किलो वजनी गटात भारताच्या पुनम यादवला सुवर्णपदक
  • सलग चौथ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सकडून दमदार कामगिरी