पूजा सहस्रबुद्धेची भावुक प्रतिक्रिया

‘‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचे माझे व कुटुंबीयांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारताना सोनेरी कामगिरी झाली. त्या वेळी भारताचा तिरंगा उंचावत जाताना व राष्ट्रगीत सादर होताना आनंदाश्रू तरळले,’’ असे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे-कोपरकरने सांगितले.

गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच टेबल टेनिसच्या सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ही कामगिरी करताना भारताने बलाढय़ सिंगापूर संघावर सनसनाटी विजय नोंदवला. या यशामध्ये पूजाचा महत्त्वाचा वाटा आहे. पूजा ही या स्पर्धेतील वैयक्तिक विभागातही सहभागी झाली आहे.

सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर तुझी नेमकी काय भावना होती असे विचारले असता पूजाने सांगितले, ‘‘आम्ही अजिंक्यपद मिळवले आणि तेही सिंगापूरला पराभूत करून, यावर प्रथम आमचा विश्वासच बसला नाही. मनिका बात्राने निर्णायक विजय मिळवल्यानंतर आम्ही तिचे अभिनंदन करण्यासाठी टेबलपाशी आलो तेव्हा उपस्थित असलेल्या अनेक प्रेक्षकांनी तिरंगा फडकावत भारताचा जयघोष केला आणि आम्हाला खूप आनंद झाला. गेले अनेक महिने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्यामुळे अतिशय समाधान वाटले.’’

विजेतेपदाच्या नियोजनाबाबत पूजा म्हणाली, ‘‘अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर संघातील सर्व खेळाडू व साहाय्यक प्रशिक्षकांची एकत्रित बैठक झाली. सिंगापूर हा विजेतेपदासाठी हुकमी संघ असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सर्वोच्च कौशल्य, संयम, आत्मविश्वास आवश्यक आहे, असे आमचे इटालियन प्रशिक्षक मॅसिमो कॉन्स्टन्टिनी यांनी सुचवले.  सिंगापूर संघातील कोणत्या खेळाडूविरुद्ध कोणती शैली व तंत्र वापरायचे हेही त्यांनी आम्हाला सांगितले व त्यानुसार अंतिम सामन्यासाठी सराव केला. आमच्या संघाच्या यशात बात्राचा मोठा वाटा आहे. तिने अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली.’’

‘‘रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी गेली दीड वर्षे सुरू होती. विविध स्पर्धामधील सहभागाचाही त्यामध्ये समावेश होता. या तयारीसाठी राष्ट्रीय महासंघाकडूनही भरपूर सहकार्य मिळाले. जागतिक क्रमवारीत भारताच्या सहा खेळाडूंनी पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. यावरूनच आम्ही केलेली प्रगती सिद्ध होते. परदेशातील स्पर्धाचा अनुभवही आम्हाला राष्ट्रकुलच्या विजेतेपदासाठी उपयुक्त ठरला,’’ असे पूजाने सांगितले.

राष्ट्रकुलचे हे सुवर्णपदक मी आईला अर्पण करत आहे. दीड वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. मी जागतिक स्तरावर सुवर्णपदक मिळवावे हे तिचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाले, तथापि ते पाहण्यासाठी ती हयात नाही, याचे दु:ख आहे. माझे पती अनिकेत व त्याचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय टेबल टेनिस क्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्याकडून सतत प्रोत्साहन मिळत असते. त्यांचाही या पदकात वाटा आहे.

पूजा सहस्रबुद्धे