भारताच्या प्रदीप सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील वेटलिफ्टिंगमधील १०५ किलो वजनी गटात समोआच्या सॅनीली माओला कडवी लढत दिली; परंतु अखेरीस त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके पटकावली आहेत.

राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रदीपने या स्पध्रेत एकंदर ३५२ किलो (स्नॅच १५२ किलो + क्लीन-जर्क २०० किलो) वजन उचलले. मात्र माओपुढे प्रदीपची कामगिरी झाकोळली गेली.

२३ वर्षीय प्रदीपने क्लीन आणि जर्कमधील अखेरच्या प्रयत्नात २११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला असता, तर तो राष्ट्रकुलमधील आणि या वजनी गटातील नवा विक्रम नोंदला गेला असता; परंतु दुर्दैवाने प्रदीप अपयशी ठरला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात २०९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र वजन उचलताना कोपर वाकवल्याचे कारण देत पंचांनी तो अयोग्य ठरवला.

माओचासुद्धा अखेरचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याला तिसऱ्या प्रयत्नात २०६ किलो वजन उचलता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नातील २०६ किलो वजन ग्राह्य़ धरण्यात आले. १५४ किलो स्नॅचमधील वजनासह त्याने एकंदर ३६० किलो वजन उचलले. इंग्लंडच्या ओवेन बॉक्सॉल याला कांस्यपदक मिळाले.

क्लीन आणि जर्कमध्ये याआधी २१५ किलो ही माझी सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. दुसरा प्रयत्न अयोग्य का ठरवण्यात आला, ते अजूनही मला कळले नाही. मात्र आजचा दिवस माझा नव्हता. माझ्या नशिबात कदाचित रौप्यपदकच असावे.

प्रदीप सिंग